Jalgaon Municipal Corporation : जळगाव महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, त्यात सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
सदस्य निवडीची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी नुकतीच गटनेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रकाश बालाणी (भाजप), विष्णू भंगाळे (शिंदे सेना), इब्राहिम पटेल (उद्धव सेना), प्रफुल्ल देवकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि माजी महापौर नितीन लढा उपस्थित होते.
दोन्ही समित्यांमध्ये राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार जागांचे गणित निश्चित करण्यात आले आहे. सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ १ सदस्य असल्याने, त्यांना तांत्रिक कारणास्तव दोन्हीपैकी कोणत्याही समितीत स्थान मिळणार नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचा एकच नगरसेवक असल्याने या पक्षाला संधी साठी महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपाची मेहर नजर असणे गरजेचे आहे.
निवडीची प्रक्रिया अन् पुढील टप्पे
१६ फेब्रुवारी रोजी सर्व गटनेते आपापल्या सदस्यांची नावे बंद पाकिटात महापौरांकडे सुपूर्द करतील. त्यानंतर महापौर या नावांची घोषणा करतील. या निवडीनंतर आयुक्त हा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवतील. त्यानंतर विभागीय आयुक्त या प्रक्रियेनंतर दोन्ही समित्यांच्या सभापती निवडीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करतील.








