Jalgaon Crime : जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील भास्कर मार्केट परिसरातील पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपासंदर्भात हा प्रकार आहे. या पेट्रोल पंपावर तब्बल 1 कोटी 33 लाख 752 रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे पोलीस उपनिरिक्षकाने हा उपहार केल्याचे समोर आले असून याप्रकरणी संशयित पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (57, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या वाघ फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत शहरातील भास्कर मार्केटसमोरील पेट्रोल पंप चालविला जातो. दक्षता पेट्रोल पंप या नावाने हा पेट्रोल पंप चालविता जातो. या पेट्रोल पंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपविली होती. मात्र, त्यांनी दोन ते तीन महिन्यांपासून बँकेत रक्कम जमा केली नाही. पंपावरील रोख रक्कम वेळोवेळी बँकेत भरणा करण्याबाबत वाल्मीक वाघ यांना प्रभारींनी सूचना देण्यासह रोखवही व भरणा पावती पुस्तक दाखविण्याविषयी सांगितले. मात्र, प्रत्येक वेळी बहाणे करून रेकॉर्ड दाखविण्यास टाळाटाळ केली. या प्रकार लक्षात घेत यात अपहार झाल्याचे लक्षात घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखापरिक्षणातून झाला अपहार उघड
प्राथमिक चौकशीत पोउपनि वाघ यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बँकेत नियमित भरणा न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर पडताळणीचे आदेश होते. त्यानुसार, लेखापाल एस. आर. पलोड यांनी 1 एप्रिल 2025 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीचे लेखापरीक्षण केले. त्यात विक्रीच्या तुलनेत जमा रक्कममध्ये तफावत दिसून आली. लेखापरिक्षणानुसार, या कालावधीत 4 कोटी 93 लाख 733 हजार 686 रुपयांची पेट्रोल विक्री झाली आहे. प्रत्येक्षात मात्र, फक्त 3 कोटी 59 लाख 25 हजार 18 रुपये बँकेत जमा झाल्याची नोंद आहे. त्यानुसार, उर्वरित 1 कोटी 33 लाख 752 रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी प्रभारी संदीप पाटील यांच्या फिर्यादिवरुन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात वाल्मीक वाघ याच्याविरुद्ध भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.








