Mumbai News: राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने साधारणपण दीड वर्षांपूर्वी कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स (सीपीएस) या संस्थेची मान्यता रद्द केली. त्यामुळे या संस्थेमध्ये पदविका पदव्युत्तर शिक्षणासाठी 2022 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास दोन हजार डॉक्टरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मान्यता रद्द केल्याने परीक्षा घेण्याचे अधिकार नसल्याचे सीपीएसकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झालेल्या या डॉक्टरांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपली परीक्षा घ्यावी यासाठी हे विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत.
एमडी, एमएस या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीपीएसमार्फत राबविण्यात येणारे पदविका अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरत होते. सीपीएस ही संस्था मागील 120 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण देत आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उडीसा, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार या राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण दिले जाते.
मुंबईस्थित असलेल्या या संस्थेमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 2025 मध्ये सीपीएसची मान्यता रद्द करण्यात आली. या संस्थेच्या दोन वर्षांच्या पदविका पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 2022 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे 2024 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून आरोग्य सेवा बजावत आहेत.
तर अनुत्तीर्ण झालेले किंवा काही कारणास्तव परीक्षा देऊ न शकलेले विद्यार्थी मागील दीड वर्षांपासून परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. मान्यता रद्द झाल्याने एप्रिल 2025 मध्ये नियोजित परीक्षा सीपीएसला रद्द करावी लागली. मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाला सीपीएसकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने महाराष्ट्रातील एक हजार डॉक्टरांसह देशातील 2 हजार 285 डॉक्टरांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.
परिक्षा घेण्याची मागणी
शिक्षण पूर्ण करूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 11 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालयाने लवकरात लवकर परीक्षा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉक्टर प्रत्यक्ष विविध रुग्णालयांमध्ये काम करत असून ते जवळपास अडीच लाखांच्या आसपास मासिक वेतन घेत आहेत. मात्र आम्ही शिक्षण घेऊनही या विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









