होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात दर्जा आणि गुणवत्ता राखा; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आदेश

On: March 28, 2026 6:47 PM
Follow Us:
---Advertisement---

Simhastha Kumbh Mela 2026: नाशिक -त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातंर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित व सुरू असलेली सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होतील यावर अधिक भर देत कामांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, उपवनसंरक्षक (पश्चिम) सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगरचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, दक्षता व गुणवत्ता नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता कंकरेज, सा. बा. विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, मुकेश ठाकूर, उप अभियंता विजय बाविस्कर, उमाकांत कुमावत, राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भोसले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने करण्यात येणारी सर्व कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राधान्य क्रमातील कामे आहेत. ही सर्व कामे दर्जात्मक होण्यासाठी त्रयस्थ पक्षाकडून कामांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर या कामांची त्रयस्थ पक्षाकडून तपासणी केल्यास कामे गुणवत्तापूर्वक होतील यासाठी दक्ष रहावे. ज्या कामांना मंजूरी मिळाली आहे व कोणत्याही स्वरूपाची अडचण नाही ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, वन विभाग व जलसंपदा विभाागने रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी तत्पर कार्यवाही करावी. ठेकेदारांनीही विहित मुदतीत कामे पुर्ण करण्यावर अधिक भर द्यावा. पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे तसेच रात्रीच्या वेळीही कामे सुरू ठेवावीत. कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाईबाबत अवगत करण्यात यावे. अशा सूचना त्यांनी दिल्या.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता तयार करतांना सुशोभिकरणावर भर द्यावा. तसेच ठिकाठिकाणी भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने लावण्यात येणारे दिशादर्शक फलक यांच्या आकारात एकसमानता असावी, असेही मंत्री भोसले यांनी सूचित केले.यावेळी विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यातील नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित व मंजूर कामांची माहिती दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील कुंभमेळा प्रस्तावित आवश्यक परवानग्या व त्याबाबत करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी या कामांसाठी आवश्यक भूसंपादन व इतरबाबत बैठकीत माहिती दिली. अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आराखड्याद्वारे सादरीकरण केले. तसेच प्रत्येक कामासाठी नियुक्त केलेल्या संस्था व ठेकेदार यांच्याशी कामांबाबत असलेल्या अडीअडचणींबाबत मंत्री भोसले यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी सिंहस्थ कामांची पाहणी देखील केली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment