Jalgaon News: बाजारातील मागणी आणि पुरवठा स्थितीचा थेट परिमाण सोन्याच्या दरावर होत आहे, जळगाव शहरात सोने बाजारपेठेत शनिवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅमला १,५३,७७९ रुपयांवर स्थिर होते. मात्र सोमवारी त्यात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले, सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,९८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, मंगळवारी बाजारपेठ उघडल्यावर १३०० रुपयांची घट नोंदवली गेली, त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६७६ रुपयांपर्यंत खाली आले, सोन्याचा दर उतरल्याने खरेदीसाठी ग्राहकांना ही मोठी संधी आहे. त्याचा फायदा ग्राहक उचलत आहेत.
बाजारातील मागणी आणि पुरवठा याचा थेट परिणाम सोन्याचे दरावर होत असतो. सध्या आंतराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारात चढ उतार दिसून येते आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली. सोन्यातील घसरण हे ग्राहकांना खरेदीची चांगले वेळ मानली जाते. दीर्घकालीन गुंतवणुकीपूर्वी बाजारातील ट्रेंड, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आर्थिक निर्देशक यांचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक आणि बाजारातील जाणकारांचा सल्ला ही घेणे महत्त्वाचे आहे, अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे आणि जोखीम कमी करून सुरक्षित गुणतवणुकीला प्राधान्य द्यावे लागेल.
सध्या लग्नसराईचा हंगाम जवळ येत आहे, नागरिकांना या काळात घसरण फायदेशीर ठरेल. असे जाणकारांना वाटते. सध्या जागतिक स्तरावर सोन्याचा दर प्रति औंस सुमारे ४,६३० डॉलरच्या आसपास आहे. डॉलर मजबूत होत असल्याने आणि प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी काहीशी कमी होत आहे. परिणामी, सोन्याच्या दर कमी होतांना दिसून येत आहे.
जागतिक घटकांचा प्रभाव कायम राहिल्याने पुढील काळात किमतींमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांनी सतर्क राहून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर त्यात ३०९० घसरण झाली. त्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४५, १४० रुपयांपर्यंत खाली आले.







