Summer Health Tips: जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरु आहे. उन्हाच्या झळा आरोग्यासाठी घातक ठरु लागल्या आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 42 अंशाचा पार गेला आहे. यात उष्णतेची लाट अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे. जिवाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी बाहेर जावे लागत असेल, तर काही आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. छोट्या उपायांमुळे केवळ तुमच्या त्वचेचे आणि आरोग्याचेच संरक्षण होणार नाही, तर उष्णतेमुळे होणाऱ्या समस्यांनाही प्रतिबंध होईल. चला तर मग, जाणून घेऊया उन्हात बाहेर जाण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहीजे.
पाणी प्या
उन्हाळ्यात, घामामुळे शरीरातील बरेच पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन (निर्जलीकरण) होऊ शकते. बाहेर जाण्यापूर्वी एक किंवा दोन ग्लास पाणी प्या. पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि वारंवार पाणी प्या. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत होते.
हलके आणि सैल कपडे परिधान करा
गडद रंग आणि घट्ट कपडे जास्त उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे उन्हात घराबाहेर पडताना सुती किंवा लिननसारखे हलके कपडे परिधान ककरा. हे कापडे घाम लवकर सुकण्यास मदत करतात आणि शरीर थंड ठेवतात. सैल कपडे घातल्याने हवा खेळती राहते, ज्यामुळे तुम्हाला अधिक आरामदायक आणि ताजेतवाने वाटते.
छत्री किंवा टोपी
प्रखर सूर्यप्रकाशात, तुमचे डोके आणि चेहरा थेट सूर्यकिरणांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. टोपी किंवा छत्री सूर्यापासून संरक्षणात्मक ढाल म्हणून काम करते. तसेच ती तुमच्या डोळ्यांना तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचवते. बाहेर जाताना ही सवय लावा.
सनस्क्रीन लावा
उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे. उन्हामुळे त्वचा काळवंडणे, सनबर्न आणि त्वचेचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी 15-20 मिनिटे आधी किमान SPF 30 असलेले सनस्क्रीन लावा. ते तुमच्या चेहऱ्यावर, हातांवर आणि मानेवरही लावा.
उन्हात कमीत कमी वेळ घालवा
दुपारी 12 ते 3 या वेळेत सूर्यकिरण सर्वात तीव्र असतात. या वेळेत बाहेर जाणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय, घराबाहेर पडू नका. महत्त्वाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा.
(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)











