होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

On: May 2, 2026 1:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जनगणना ही केवळ लोकसंख्येची गणना नसून देशाच्या नियोजनबद्ध विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अचूक माहिती अत्यंत आवश्यक असते. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक व पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्ताने येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरिश सहाय, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, स्वातंत्र सैनिक, नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन, पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, यावर्षी ही जनगणना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्णतः डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे २६ या कालावधीत “स्वयं गणना” नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात माझ्यापासून होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधली असून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमांतर्गत १ प्राथमिक आरोग्य केंद्र व १७ उपकेंद्रांना राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे, “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” मोहिमेद्वारे लोकसहभागातून आरोग्य जनजागृती, माता-बाल आरोग्य, लसीकरण, कुपोषण निर्मूलन व स्वच्छतेवर प्रभावी भर दिला जात आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाखो लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले असून सुमारे ४ लाख नागरिकांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. यासाठी शासनामार्फत ९१८ कोटी ५२ लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आले आहे.

रोजगार व शेती क्षेत्रातही विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात कामगिरी करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी याप्रसंगी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात १ हजार ६ नवीन उद्योगांना बँकांकडून मंजुरी मिळाली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे ८ लाख ५१ हजार शेतकरी व ६ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. शासनाने ७०९ कोटी ६२ हजार रुपयांची मदत मंजूर करून त्यापैकी ५१३ कोटी २१ लाख रुपये थेट ६ लाख ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

जिल्ह्यात गेल्यावर्षी विविध कल्याणकारी योजनांतून कामगारांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला असून यामध्ये ५८ हजार ६०७ कामगारांना सुरक्षा कीट, १लाख ७८ हजार लाभार्थ्यांना गृह उपयोगी संच,२ लाख ४९ हजार कामगार व कुटुंबियांची यांना आरोग्य तपासणी तसेच १४ हजार ३५० लाभार्थ्यांना ३६ कोटी ६० लाखांचे आर्थिक सहाय्य देत कामगारांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणाला भक्कम आधार मिळाला आहे.

नागरिकांनी वाढते तापमान लक्षात घेता उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. विशेषतः शेतकरी बांधव आणि कामगार वर्गाने आपल्या आरोग्याची काळजी घेत सकाळी आणि सायंकाळीच कामे करावीत. प्रखर उन्हामुळे उष्माघात, थकवा आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे थोडीशी काळजी घेतली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो, असे सांगत सर्वांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्यावासीयांना त्यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली त्यानंतर त्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदीची भेट घेतली व त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विभागातंर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय,पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय यांचा समावेश आहे.

याप्रसंगी पोलीस , होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, आरोग्य विभाग, महानगरपालिका अग्निशमन आदी विभाग परेड संचलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमाला शासकीय कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment