Jalgaon News: जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या अंमलदारांच्या बदल्यांना अखेर गुरुवारी सायंकाळी मुहूर्त गवसला. या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जारी केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या आणि पाच वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केलेल्या 342 अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. 40 कर्मचार्यांच्या विनंती बदल्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
बदलीपात्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदावरील कर्मचार्यांकडून काही महिन्यांपूर्वी इच्छित नियुक्तीस्थळांचे तीन पसंतीक्रम मागविण्यात आले होते. याच पसंतीक्रमाचा विचार करून बदल्या करण्यात आल्याने अनेक अंमलदारांना अपेक्षित ठिकाणी नियुक्ती मिळाली आहे.
महिला कर्मचार्यांचाही समावेश
या बदल्यांमध्ये 292 पुरुष अंमलदारांसह 40 महिला अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच स्वेच्छेने बदलीसाठी अर्ज केलेल्या 40 कर्मचार्यांनाही त्यांच्या मागणीनुसार नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक फौजदार / सशस्त्र पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक आदिंचा समावेश आहे.
पोलीस ठाण्यांमधील तपासाचे वाढते काम, तणाव आणि अंतर्गत जबाबदार्यांमुळे अनेक अंमलदार पोलीस मुख्यालयात नियुक्ती मिळविण्यास अधिक पसंती देत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मुख्यालयात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना बाहेर बदली करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या प्रक्रियेत अनेक तपासी अंमलदारांनी पुन्हा मुख्यालयालाच पसंती देत नियुक्त्या मिळविल्याने पोलीस मुख्यालयाची आकर्षण कायम असल्याचे दिसून येत आहे.









