MSRTC Student Pass: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा निर्णय असून नवीन शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक कागदी बस पास बंद करत त्या ऐवजी विद्यार्थ्यांना सवलतीचा प्रवास करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता येणार असून, डिजिटल व्यवस्थेला चालना मिळणार आहे. हे स्मार्ट कार्ड केवळ एसटी बसमध्येच नाही तर देशातील इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही वापरता येईल.
असं आहे NCMC स्मार्ट कार्ड
NCMC हे प्रीपेड डिजिटल स्मार्ट कार्ड आहे. या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एसटी बसमधील सवलतीचा लाभ घेता येईल. शिवाय हे कार्ड मेट्रो, बेस्ट बस, काही रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्येही वापरता येणार आहे. एकाच कार्डाने विविध वाहतुकीचे सुलभ प्रवास शक्य होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही बहुउपयोगी सुविधा ठरणार आहे. NCMC कार्डची नोंदणी विद्यार्थ्यांच्या ‘सरल’ आयडी क्रमांकाशी जोडली जाणार आहे. यामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि सवलतींचा गैरवापर रोखता येईल.
असं मिळवा कार्ड
या कार्डसाठी विद्यार्थ्यांना शाळा/महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र घेणे आवश्यक. प्रमाणपत्राच्या आधारावर नोंदणी पूर्ण होईल. अधिकृत एजंट थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन नोंदणी करतील. NCMC स्मार्ट कार्डसाठी विद्यार्थ्यांसाठी 199 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. कार्ड प्रीपेड असल्याने भविष्यात इतर वाहतूक सेवांसाठीही त्याचा वापर करता येईल.










