Jalgaon News: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याच्या गुप्त माहितीवरुन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. पथकाने कारवाई करत सुमारे 21 लाख 81 हजार 600 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. संबंधित पिकअप व्हॅनसह माल ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. अन्न सुरक्षा अधिकारी आरा खालकर यांना वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या सूचनेनंतर विशेष पथक तयार करण्यात आले आणि संशयित वाहनावर नजर ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. मुक्ताईनगरमार्गे जळगावकडे येणार्या पिकअप व्हॅनचा क्रमांक आधीच प्रशासनाकडे उपलब्ध होता. वाहन जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मागोवा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी सलग दोन दिवस पुरनाड तपासणी नाक्यावर थांबून होते. संशयित वाहन नाक्यावरून पुढे गेल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यात आला आणि त्याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.
मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु
जळगावमधील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सापळा रचून संबंधित पिकअप व्हॅन (एमएच 19- सीएक्स 3280) अडवली. वाहनाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये विमल गुटख्याच्या 58 गोण्या आढळून आल्या. बाजार मूल्यानुसार जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 21 लाख 81 हजार 600 रुपये असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. जप्त करण्यात आलेला गुटखा जिल्ह्यातील विविध भागांत विक्रीसाठी आणला जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अवैध साखळीमागील मुख्य सूत्रधार, मालाचा पुरवठादार आणि वितरण जाळ्याचा शोध घेण्यासाठी पोलिस व अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त तपास सुरू केला आहे. जप्त करण्यात आलेला माल आणि वाहन ताब्यात घेण्यात आले असून संबंधित चालकाची चौकशी सुरू आहे.
शाळा, महाविद्यालय परिसरात विक्री
दरम्यान, अवैध गुटखा विक्री आणि वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा तस्करी करणार्यांमध्ये खळबळ उडाली असून अन्न व औषध प्रशासनाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुटखा विक्रीवर बंदी असतानाही त्याची राजरोसपणे शाळा, महाविद्यालयांसह बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात विक्री होत असते.









