Amalner News: अवैध वाळू वाहतुकीविरोधात अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी रविवारी (दि. १५) पहाटे अत्यंत गोपनीय पद्धतीने धडक कारवाई करत दोन डंपर, सुमारे २७.५ ब्रास वाळू आणि अन्य साहित्य असा एकूण ४६ लाख ६६ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन डंपर चालकांविरुद्ध चोपडा पोलीस निरीक्षक पवन देसले यांना गुन्हा नोंद करण्यास सांगितले.
वाळूचे अधिकृत ठेके बंद असतानाही परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना मिळाली होती. यापूर्वी कारवाईची माहिती आधीच बाहेर जात असल्याने अनेक मोहिमा निष्फळ ठरत होत्या. त्यामुळे यावेळी त्यांनी शासकीय वाहनाचा वापर टाळत खाजगी वाहनातून अचानक छापा टाकण्याचा निर्णय घेतला.

महसूल विभागाने अशी केली कारवाई
मंडळाधिकारी गौरव शिरसाठ, ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील आणि अमोल पाटील यांना केवळ रात्रीची गस्त असल्याचे सांगून त्यांनी पहाटे चोपडा तालुक्याकडे मोर्चा वळवला. यावल रोडवरील बडगुजर पेट्रोल पंपाजवळ डंपर क्रमांक जीजे-०७-व्हीडब्ल्यू-७९३५ हा सुमारे अडीच ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला. वाहन अडवून पंचनामा करण्यात आला. चालक मनोज कैलास कोळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महसूल अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
२० लाखांचा डंपर जप्त
या कारवाईत २० लाख रुपये किमतीचा डंपर आणि ६० हजार ५७५ रुपयांची वाळू जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास जगदीश पाटील करीत आहेत. यानंतर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गरताड शिवारातील गट क्रमांक २२७/२ मधील मिक्सर प्लॉटवर दुसरी कारवाई करण्यात आली. तेथे डंपर क्रमांक एमएच-३२-क्यू-२९४ उभा असल्याचे आढळून आले. डंपरमध्ये काही प्रमाणात वाळू असून परिसरात सुमारे २५ ब्रास वाळूचा साठा आढळला. स्थानिक पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून संबंधित चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.






