Sinhastha Kumbh Mela: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत सिंहस्थ कुंभमेळा-2027 दरम्यान नाशिक परिसरात अपेक्षित असलेल्या लाखो भाविकांच्या सुरक्षित, सुलभ व सुरळीत रेल्वे प्रवासासाठी आतापर्यंतच्या सर्वात व्यापक स्थानक पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कुंभ क्षेत्रासाठी एकूण 92 पायाभूत सुविधा विकास कामांचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी 90 कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. या कामांमध्ये स्थानकांचा पुनर्विकास, यार्ड पुनर्रचना, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग, प्रवासी सुविधा, फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म कव्हर शेड, पाणीपुरवठा व्यवस्था मजबूतीकरण, होल्डिंग एरिया तसेच विविध सिविल, विद्युत व सिग्नलिंग संबंधित विकासकामांचा समावेश आहे.
प्रमुख प्रवासी पायाभूत सुविधा
कुंभ क्षेत्रातील नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या पाच महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची सुविधा आणि रेल्वे संचालनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यापक विकासकामे सुरू आहेत.
या अंतर्गत एकूण नऊ नवीन फूट ओव्हर ब्रिज पुलांचे बांधकाम करण्यात येत असून, त्यामध्ये नाशिक रोड येथे 12 मीटर रुंदीचा आणि देवळाली, ओढा, खेरवाडी व कसबे सुकाणे येथे 6 मीटर रुंदीचे आठ फूट ओव्हर ब्रिज उभारले जात आहेत. विद्यमान प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण तसेच नवीन उंचस्तरीय प्लॅटफॉर्मच्या निर्मितीद्वारे प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ करण्यात येत आहेत.
नवीन फ्लॅटफॉर्म कव्हर शेड
प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्यात संरक्षण मिळावे यासाठी 51,000 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रावर नवीन प्लॅटफॉर्म कव्हर शेड उभारण्यात येत आहेत. तसेच, नवीन उंचीच्या व भूमिगत जलसाठा टाक्यांच्या बांधकामाद्वारे पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम केली जात आहे. याशिवाय अतिरिक्त स्वच्छतागृहे, प्रशस्त सर्क्युलेटिंग एरिया तसेच इतर स्थानक सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
देवळाली स्थानक
सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने देवळाली स्थानकाचा प्रमुख रेल्वे संचालन व प्रवासी व्यवस्थापन केंद्र म्हणून विकास करण्यात येत आहे. येथील यार्डची व्यापक पुनर्रचना करण्यात येत असून त्यामध्ये एक टर्मिनल प्लॅटफॉर्म लाईन, तीन अतिरिक्त लूप लाईन्स, एक स्टेबलिंग लाईन, दोन पिट लाईन्स, एक सिक लाईन आणि एक शंटिंग नेक विकसित करण्यात येत आहेत. यामुळे गाड्यांच्या हाताळणीसह कोच देखभाल क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ची कामेही प्रगतीपथावर आहेत.
प्रवासी सुविधांच्या दृष्टीने 24 डब्यांच्या क्षमतेचे दोन नवीन उंचस्तरीय प्लॅटफॉर्म, डाउन प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्रमांक 4 चे रुंदीकरण, दोन नवीन फूट ओव्हर ब्रिज, अतिरिक्त प्लॅटफॉर्म कव्हर शेड, जलसाठा क्षमता 0.97 लाख लिटरवरून 2.50 लाख लिटरपर्यंत वाढविणे, तसेच अतिरिक्त स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात येत आहे. याशिवाय दोन कायमस्वरूपी होल्डिंग एरिया देखील विकसित केले जात आहेत.
पायाभूत विकासावर लक्ष
याशिवाय पिट लाईन संकुल, कोच तपासणी (C&W) सुविधा, गँग हट्स, पीडब्ल्यूआय कार्यालय, ट्रॅक मशीन कार्यालय, कर्मचारी निवासस्थाने, जलनिस्सारण व्यवस्था आणि संपर्क रस्ते यांसारख्या सहाय्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत असून, त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत देवळाली हे महत्त्वाचे स्टेबलिंग व देखभाल केंद्र म्हणून कार्य करण्यास सक्षम होणार आहे.
नाशिक रोड
सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या नाशिक रोड स्थानकावर सर्वाधिक प्रमाणात पायाभूत सुविधा विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. स्थानकाच्या यार्डचे पुनर्रचना करण्यात येत असून, आपत्कालीन क्रॉसओव्हर्स, कार्यक्षम परिचालनासाठी आवश्यक सुधारणा तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची उभारणी करण्यात येत आहे. प्रवासी सुविधांअंतर्गत 12 मीटर रुंदीचा नवीन पादचारी पूल (FOB), विद्यमान पादचारी पुलाच्या जागी 6 मीटर रुंदीचा नवीन फूट ओव्हर ब्रिज, 6 एस्केलेटर, डाउन प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्रमांक 4 चे रुंदीकरण, तसेच अतिरिक्त प्लॅटफॉर्म कव्हर शेडचे बांधकाम करण्यात येत आहे. जलसाठा सुविधांचा विस्तार केला जात असून 16 नवीन स्वच्छतागृहांची उभारणी केली जात आहे. तसेच, शाही स्नानाच्या काळातील प्रचंड गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी स्थानकाबाहेर दोन कायमस्वरूपी होल्डिंग एरिया विकसित करण्यात येत आहेत.
ओढा
ओढा स्थानकाचे व्यापक यार्ड पुनर्रचना कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण स्टेबलिंग व परिचालन केंद्र म्हणून रूपांतर करण्यात येत आहे. यासाठी 3 अतिरिक्त लूप लाईन्स आणि 6 स्टेबलिंग लाईन्स उभारल्या जात आहेत. ट्रॅक, फॉर्मेशन आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) संबंधीची कामे बांधकाम विभागामार्फत सुरू असून, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सिग्नल व दूरसंचार (S&T) विभागाची कामेही प्रगतीपथावर आहेत. प्रवासी सुविधांमध्ये 2 नवीन फूट ओव्हर ब्रिज, 1 अतिरिक्त प्लॅटफॉर्म व त्यावरील कव्हर शेड, जलसाठा क्षमता 2.5 लाख लिटरपर्यंत वाढविणे, 12 नवीन स्वच्छतागृहे तसेच 2 होल्डिंग एरिया विकसित करण्यात येत आहेत. या विकासकामांसाठी सुमारे 35,300 चौ. मीटर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.
खेरवाडी स्टेशन
खेरवाडी स्थानकावर रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी तीन अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्सचे बांधकाम, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ट्रॅक्शन वितरण व्यवस्था तसेच यार्डमधील आवश्यक सुधारणा करण्यात येत आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी दोन नवीन फूट ओव्हर ब्रिज (FOB), दोन अतिरिक्त उच्चस्तरीय (हाय-लेव्हल) फलाट, फलाटांवर कव्हर शेड, पाणी साठवण क्षमतेत वाढ करून २.५ लाख लिटर क्षमता, १२ अतिरिक्त स्वच्छतागृहे तसेच दोन होल्डिंग एरिया विकसित करण्यात येत आहेत. या सर्व कामांसोबतच राज्य शासनाच्या समन्वयाने भूसंपादनाची प्रक्रिया देखील प्रगतीपथावर आहे.
कसबे सुकेणे स्टेशन
कसबे सुकेणे स्थानकावर यार्डचे पुनर्रचना (यार्ड रिमॉडेलिंग) करून एक अतिरिक्त लूप लाईन, तीन स्टेबलिंग लाईन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग तसेच संबंधित प्रवासी सुविधांचा विकास करण्यात येत आहे. सविस्तर अभियांत्रिकी व्यवहार्यता लक्षात घेऊन फलाट क्रमांक १ चे रुंदीकरण करण्यात येत आहे. स्थानकावर दोन नवीन फूट ओव्हर ब्रिज (FOB), फलाटांवर कव्हर शेड, पाणी साठवण क्षमता १ लाख लिटरपर्यंत वाढविणे, आठ अतिरिक्त स्वच्छतागृहे तसेच दोन होल्डिंग एरिया उभारण्यात येत आहेत. अभियांत्रिकी कामांसोबतच भूसंपादनाची प्रक्रियाही समांतरपणे सुरू आहे.
कॉरिडॉर स्तरावरील व्यापक अभियांत्रिकी कार्यक्रम
मध्य रेल्वेकडून स्थानकांच्या विकासकामांबरोबरच मनमाड–इगतपुरी दरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग (ABS) प्रणालीची अंमलबजावणी, १२ स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI), ट्रॅक्शन वितरण व्यवस्थेची व्यापक कामे तसेच संपूर्ण कुंभ कॉरिडॉरमध्ये नागरी (Civil), अभियांत्रिकी (Track), सिग्नल व दूरसंचार (S&T) आणि विद्युत विभागांची समन्वयाने पायाभूत विकासकामे वेगाने सुरू आहेत.
नागरी कामांना प्राधान्य देऊन ती लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्ससाठी आवश्यक ट्रॅक लिंकिंग व ट्रॅक्शनशी संबंधित कामे टप्प्याटप्प्याने राबविली जात आहेत, जेणेकरून रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. परमनंट वे (Permanent Way) तसेच सिग्नल व दूरसंचार विभागासाठी आवश्यक साहित्य नियोजन रेल्वे मुख्यालयाच्या समन्वयाने पूर्ण करण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने कार्यान्वयनाच्या नियोजनाद्वारे सर्व कामांवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे.
रेल्वेची कार्यक्षमता वाढणार
या सर्वसमावेशक पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमामुळे रेल्वेची कार्यक्षमता व वहनक्षमता वाढणार आहे, प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ होतील, सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि सिंहस्थ कुंभ मेळा-२०२७ दरम्यान नाशिक परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांना जागतिक दर्जाच्या रेल्वे सुविधा उपलब्ध होतील. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक असलेल्या या सोहळ्यासाठी सुरक्षित, कार्यक्षम व आरामदायी रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेला या उपक्रमातून अधिक बळ मिळणार आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेवर भर
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून सिंहस्थ कुंभ मेळा-२०२७ साठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि आरामदायी रेल्वे प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नाशिक विभागातील सुरू असलेल्या या विकासकामांमुळे प्रवासी सुविधा, रेल्वेची कार्यक्षमता आणि सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय वाढ होईल तसेच या प्रदेशाच्या दीर्घकालीन विकासालाही चालना मिळेल. सिंहस्थ कुंभ मेळा-२०२७ सुरू होण्यापूर्वी सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यासाठी प्रत्येक कामावर सातत्याने व बारकाईने देखरेख ठेवली जात आहे.







