अमोल महाजन
Jalgaon News: ग्रामीण भागात सध्या भीतीचे सावट पसरले आहे. शेतात काम करणारे शेतकरी, लहान मुले आणि सामान्य नागरिक आपल्याच गावात, घरात आणि शेतात सुरक्षित उरलेले नाहीत. बिडगाव (ता. चोपडा) येथील बडवाणी परिसरात भरदिवसा चार अस्वलांच्या टोळीने धुमाकूळ घालून दोन ग्रामस्थांना गंभीर जखमी केले, ज्यातील एकाचा डोळा निकामी झाला. साक्री तालुक्यातील छाईल परिसरात बिबट्याचा भरदिवसा झालेला वावर असो वा अक्कलकुव्यात घराबाहेर बांधलेल्या सात शेळ्यांचा बिबट्यांनी घेतलेला बळी असो; वन्यप्राणी आता थेट मानवी वस्तीत शिरून हल्ले करत आहेत. परंतु, या भीषण परिस्थितीपेक्षाही संतापजनक बाब म्हणजे वन विभागाचा निष्काळजी आणि निष्प्रभ कारभार दिसून येत आहे.
बडवाणी येथील घटना
बडवाणी येथील घटनेत अस्वलांच्या हल्ल्याची माहिती नागरिकांनी तातडीने देऊनही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तब्बल दोन तास घटनास्थळी पोहचले नाहीत. ही केवळ दिरंगाई नसून नागरिकांच्या जिवाशी खेळणारा निष्काळजीपणा आहे. घटनेच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ४० लहान मुले उपस्थित होती. जर या हिंस्र प्राण्यांचा मोर्चा शाळेकडे वळाला असता, तर होणाऱ्या बालकांच्या जीवितहानीची जबाबदारी वन विभागाने घेतली असती का? वन विभागाची भूमिका सध्या फक्त “घटनेनंतर पाहणी करणे” आणि “एकट्याने फिरू नका” असे कागदी सल्ले देण्यापुरतीच उरली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

उपाययोजना करण्यात अपयशी
* पिंजरे लावण्यात टाळाटाळ: हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढूनही त्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरे लावले जात नाहीत.
* गस्त आणि उपाययोजनांचा अभाव: शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी रात्रीची व दिवसाची गस्त वाढवण्यात वन विभाग अपयशी ठरला आहे.
* आपत्कालीन प्रतिसादाचा अभाव: माहिती दिल्यानंतरही तासनतास घटनास्थळी न पोहचणे, ही या विभागाची सवय झाली आहे.
नागरिकांनी भयभीत होऊन घरात बसावे आणि वन विभागाने केवळ पंचनामे करत बसावे, ही शोकांतिका आहे. आता नुसती आश्वासने आणि सल्ले नकोत! वन विभागाने त्वरित जागृत होऊन या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, प्रभावी गस्त घालावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा, प्रशासनाच्या या कुंभकर्णी निद्रेविरोधात जनतेचा तीव्र उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.










