Dhule News: शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग, बॅनर व जाहिरातींवर धुळे महानगरपालिकेने आता अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट जागेवरच दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे अनधिकृत बॅनरची स्थळ पाहणी, पंचनामा, दंड निश्चिती आणि संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग व बॅनरची प्रत्यक्ष जागेवर स्थळ पाहणी करून नियुक्त चार क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन पंचनामा करण्यात येत आहे. स्थळपाहणीच्या वेळी बॅनरचा लाईव्ह फोटो, बॅनरवरील मजकूर व आवश्यक माहिती ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केली जाते. त्यानंतर पंचनामा पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीचा नियमानुसार दंड निश्चित करून संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला ऑनलाईन पद्धतीने दंडात्मक नोटीस बजावली जाते.

६७ लाखांच्या नोटीसा
या अद्ययावत प्रणालीच्या माध्यमातून आजपर्यंत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या एकूण 46 अनधिकृत होर्डिंग-बॅनरचे ऑनलाईन पंचनामे करण्यात आले आहेत. संबंधितांना एकूण 67,15,660/- रुपये इतक्या रकमेच्या दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दंडात्मक नोटिसा बजावण्यात आलेल्या व्यक्ती व संस्थांकडून महानगरपालिका अधिनियमानुसार दंड वसुलीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ऑनलाईन प्रणालीद्वारे तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात येणाऱ्या बॅनर परवानगीचे रुपये 86,000/- मात्र मनपा प्रशासनास प्राप्त झाले आहेत.
‘शहर सुंदर ठेवणे ही सर्वांची जबाबदारी’
शहरातील रस्ते, चौक, विद्युत खांब तसेच सार्वजनिक ठिकाणांचे अनधिकृत जाहिराती व बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महानगरपालिकेने ही अद्ययावत ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग-बॅनर लावणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी.
अनधिकृत जाहिराती व बॅनर लावणे टाळून शहराच्या सौंदर्यीकरणास सहकार्य करावे आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन धुळे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.








