Bhadgaon News: भडगाव शहरातील आझाद मित्र मंडळाने (Azad Mitra Mandal) तब्बल ४१ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. ज्येष्ठांनी १९८५ मध्ये सुरू केलेली ही परंपरा आजच्या पिढीनेही त्याच उत्साहाने पुढे नेत समाजोपयोगी उपक्रमांचा वारसा कायम ठेवला आहे. यंदाही मंडळाने आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना करून विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे. (Educational And Health Program)
सामाजिक एकोपा
आझाद मित्र मंडळाचा गणेशोत्सव (Ganesh Festival) हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणारा उत्सव म्हणून ओळखला जात आहे. दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर आदींचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी ही प्रोत्साहन दिले जाते.
मंडळातर्फे सामाजिक उपक्रम
मंडळाने यापूर्वी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच भडगाव शहरातील विविध वाचनालयांना स्पर्धा परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
खेळातून ज्ञानदान
महिलांसाठीही मंडळाने विशेष उपक्रम राबविले आहेत. महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा, दैनंदिन जीवनातील मानसिक ताणतणावातून काही काळ मुक्तता मिळावी आणि मनोरंजनातून ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने ‘खेळातून ज्ञानदान’ आणि मनोरंजनात्मक ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भव्य आरोग्य शिबिर
यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने आरोग्याला विशेष प्राधान्य दिले असून विविध आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात आवश्यक तपासण्या व मार्गदर्शनासोबतच गरजू रुग्णांना औषधोपचार आणि आवश्यक उपचारासाठी मंडळाच्या माध्यमातून मदत करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
मैदानी खेळ
तसेच लहान मुलांचे शारीरिक आरोग्य व शरीरसृष्टी मजबूत राहावी, त्यांच्यात खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी विविध मैदानी व मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘उत्सवातून समाजसेवा आणि समाजसेवेतून सामाजिक एकोपा’ या भावनेतून आझाद मित्र मंडळाचे कार्य सुरू असून, आगामी काळातही समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी व्यक्त केला आहे. आझाद मित्र मंडळाच्या या उपक्रमांचे नागरिक व गणेशभक्तांकडून स्वागत होत असून, भडगाव शहरासह तालुक्यातील इतर गणेश मंडळांनीही उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवून शहर व समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.










