Edible Oil Prices Hike : गेल्या अनेक दिवसांपासून भाववाढ नसलेल्या खाद्यतेलाच्या भावात वाढ होऊन सोयाबीन तेल १४२ ते १४४ तर शेंगदाणा तेल २०५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.
साधारण दीड वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ झाली नव्हती तर इतर तेलाच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू होता. गेल्या आठवड्यापासून तीळतेल वगळता इतर सर्वच खाद्य तेलांच्या किमतीत वाढ सुरू झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ नव्हती. मात्र अवकाळीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या किमान आधारभूत किमतीत केलेली वाढ, डॉलरचे दर वाढणे व पाठोपाठ शेंगदाणा तेलाची निर्यात सुरू झाल्याने तेलाच्या भावात वाढ झाली आहे.
यामुळे झाली भाववाढ
अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, सोयाबीनच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ व अमेरिकन डॉलरच्या दरात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या कारणांनी खाद्यतेलाच्या भावात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.









