वरणगाव : येथील प्रभाग क्रमांक १० मधील गणपती नगर, जालंधर नगर, सिद्धेश्वर नगर व हनुमान नगर या भागात शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुढाकार घेत काटेरी झुडपे व नाल्यांची साफसफाई केली. या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक १० हा शहरातील सर्वात मोठा परिसर असून या भागात मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडे व झुडपे वाढली होती. तसेच गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या नगरसेविका तृप्ता महाजन, विनोद झोपे आणि माला मेढे यांच्याकडे तक्रार केली.
तक्रारीची दखल घेत नगरसेवकांनी तात्काळ नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण करून संबंधित भागातील काटेरी झुडपे काढून घेतली तसेच नाल्यांची साफसफाई करून घेतली. या कामामुळे परिसर स्वच्छ झाल्याने नागरिकांनी नगरसेविका तृप्ता महाजन, विनोद झोपे आणि माला मेढे यांचे कौतुक केले.








