होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon News: एकनाथ खडसेसह त्यांच्या कन्येवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या!

On: March 30, 2026 6:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Eknath Khadse Fraud case: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याविरोधात जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीनंतर येथील चमेलाबाई तायडे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ गणपत खडसे यांच्यासह शारदा एकनाथ खडसे, सुधाकर पाटील आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील वादग्रस्त भूखंड प्रकरणानंतर पुन्हा बोदवड येथील प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत आले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीत म्हटले कि, एकनाथ खडसे यांनी या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ सुरू करण्याचे आमिष दाखवून ही जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. जमिनीचा चांगला मोबदला आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात रोजगार देण्याची हमी, त्यावेळी देण्यात आली होती. नेमके हे प्रकरण 2002 सालातील आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक 122 ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. तक्रारदार तायडे यांनी म्हटले की खडसे यांनी अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन 51 हजार रुपये आगाऊ दिले, आणि सर्वांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी केली. मात्र, अनेक वर्षे उलटूनही तिथे कारखाना उभारला गेला नाही. 2025 मध्ये कुटुंबाने या जमिनीची माहिती काढली असता, ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

दरम्यान या प्रकरणात खरेदी खतात फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता , दि.11 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा मूळ खरेदीखताची प्रत तपासण्यात आली, तेव्हा त्यात धक्कादायक फेरफार दिसले. खरेदीखतामध्ये जिथे ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ असे नाव होते, तिथे खाडाखोड करून शारदा एकनाथ खडसे हे नाव असल्याचे दिसले. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांना प्रकरणाची माहिती दिल्यावर त्यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन न्याय मागितला. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात हा प्रकार उघडकीस आला असे सूत्रांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment