Bhuasavl News: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने २०२५- २६ या आर्थिक वर्षात नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या आर्थिक वर्षात विभागाने १,७३६ कोटी इतका सर्वोच्च एकूण महसूल मिळवत मागील वर्षामधील १६२८.४९ कोटी या विक्रमाला मागे टाकले आहे. ही वाढ ६.६२ इतकी आहे. विभागाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण यश दर्शवते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने उत्कृष्ट वाढ, कार्यक्षमतेत वाढ आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची वचनबद्धता यांचे प्रभावी प्रदर्शन केले आहे.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात प्रवासी महसूल हा महसूलाचा मुख्य आधार ठरला असून त्यात भुसावळ विभागाने ९३८.१ कोटी इतका महसूल मिळवून ९.१ वाढ नोंदवली आहे. या मधून प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, सुधारित सेवा आणि कार्यक्षम व्यवस्थापन स्पष्ट होते. मालवाहतुकीतून ऑटोमोबाईल, मका व अन्नधान्य वाहतुकीत उच्चांकी महसूल गोळा केला. भुसावळ विभागाने या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ऑटोमोबाईल वाहतूकीतून भुसावळ विभागाने ५१.६५ कोटींचा महसूल मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पूर्वीचा सर्वोत्तम महसूल ४१.१० कोटी (२०२३-२४) इतका होता. ऑटोमोबाईल रेक्सची संख्या ३५१ इतकी नोंदविण्यात आली असून, मागील वर्षी ही संख्या ३०३ होती.
मका वाहतूकीतून भुसावळ रेल्वेला उच्चांकी ८३.९५ कोटींचा महसूल मिळवला. यापूर्वीचा सर्वोत्तम आकडा ७६.३६ कोटी (२०२३-२४) होता. अन्नधान्य वाहतूकीतून ९९.७० कोटी महसूल मिळवून मंडळाने आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम नोंदविला आहे. या पूर्वीचा सर्वोत्तम महसूल ८१.९८ कोटी (२०२४-२५) होता. ही कामगिरी विभागाच्या मजबूत लॉजिस्टिक नेटवर्कचे आणि औद्योगिक व कृषी पुरवठा साखळीतल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे प्रतीक आहे.
भुसावळ विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात भाडे महसूल वाढविण्यात विभागाने लक्षणीय प्रगती साधली आहे: पार्किंग करारकून ५.२१ कोटी महसूल मिळाला असून ही वाढ १६.४ टक्के आहे. केटरिंग (खानपान) सेवेतून ११.३० कोटी महसूल तर व्यावसायिक जाहिरातीतून ८ कोटी महसूल (५.५४ % वाढ) मिळाला आहे. तिकीट तपासणी मोहिमा अधिक प्रभावी व नियोजनबद्ध पद्धतीने राबवून, भुसावळ विभागाने या वर्षात महसूल व प्रकरणांच्या संख्येत वाढ नोंदविली आहे. तिकीट तपासणीतून ८१.२३ कोटींचा महसूल मिळाला. या पूर्वीचा सर्वोत्तम महसूल ७१.६ कोटी (२०२२-२३) होता. ही वाढ १४.३१ टक्के आहे. तिकीट तपासणी मोहिमेतून ९.६३ लाख प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापूर्वीचा सर्वोत्तम आकडा ९.२० लाख (२०२२-२३) होता. यामध्ये ४.६६% वाढ झाली आहे.
२०२५-२६ आर्थिक वर्षातील भुसावळ विभागाची ही उल्लेखनीय कामगिरी कार्यक्षम नियोजन, उत्कृष्ट अंमलबजावणी आणि समर्पित कर्मचा-यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. विक्रमी महसूल, मजबूत मालवाहतूक, वाढता गैर-भाडे महसूल आणि प्रभावी अंमलबजावणी यांव्दारे विभागाने भारतीय रेल्वेमध्ये नवा आदर्श निर्माण केल्याचे भुसावळ विभागाने नमूद केले आहे.






