Erandol news: बनावट आणि प्रतिबंधित बियाणांच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे कृषी विभागाने गुरुवारी मोठी कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत सुमारे पावणेपाच लाखांचे बियाणे आणि पाच लाखांची एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच दोन जणांविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बोगस बियाणांच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या, त्याची दाखल कृषी विभागाने घेत ही कारवाई केली आहे.

कृषी विभागाला कासोदा परिसरात काही व्यक्तींकडून शेतकऱ्यांना गुप्तपणे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे ही विक्री कोणतीही अधिकृत परवानगी नसताना छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि कीड प्रतिबंधक गुणधर्मांचे आमिष दाखवून या बियाण्यांची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार कृषी विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने तपास मोहीम हाती घेतली. गुरुवारी कृषी विभागाच्या पथकाने कासोदा येथे अचानक धाड टाकली.
तपासणीदरम्यान योगेश बळवंत पाटील हा व्यक्ती संशयास्पदरीत्या कापूस बियाण्यांचा साठा करून त्यांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी केली असता ‘प्रीमियम रिसर्च हायब्रीड कॉटन सीड’, ‘श्री गणेशा +5G’ आणि ‘आकाश +5G’ या नावांची प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची ४०० पॅकेट जप्त करण्यात आली. प्रत्येक पॅकेटमध्ये ४५० ग्रॅम बियाणे असून, एकूण आठ पोत्यांमध्ये हा साठा ठेवण्यात आला होता.
कारवाईत सुमारे ४ लाख ७५ हजार २०० रुपयांचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले. तसेच बियाण्यांची वाहतूक आणि साठवणुकीसाठी वापरण्यात येत असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. वाहनाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत जवळपास १० लाख रुपयांपर्यंत पोहचली आहे.
दरम्यान निखिल टोळकर यांनी कासोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून योगेश पाटील (रा. सौंदाणे, ता. जि. धुळे) आणि नितीन देवरे (वाडी भोकर, ता. जि. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांवर बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या अवैध व्यवहारामागील इतर संबंधितांची माहितीही तपासली जात आहे.
कारवाईत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, कृषी अधिकारी परेश बडगुजर, सचिन पाटील, कासोदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी सहभाग घेतला. निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) उल्हास ठाकुर, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनधिकृत किंवा प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. बाजारात काही विक्रेते जास्त उत्पादनाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे विभागाने नमूद केले आहे. शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.






