Jalgaon News: जिल्ह्यात एक घटना समोर आली आहे, रोटरमध्ये सापडून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यात घडली आहे. मृताचे नाव योगेश यशवंत पाटील (वय 28, रा. दहिगाव, ता. यावल) असे आहे. या दुर्दैवी घटनेमुळे यावल परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेतात काम करत असतांना ट्रॅक्टरवरून अचानक तोल जाऊन पडल्याने, रोटरमध्ये सापडून ट्रॅक्टर चालवणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावल तालुक्यातील मोहराळा येथे शोभराज महाजन यांचे शेत आहे. या शेतात जमीन मशागतीचे काम करण्यासाठी दहिगावचा योगेश पाटील या तरुणाला बोलावले होते, हा तरुण स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर (Tractor) घेऊन गेला आणि शेतात रोटर फिरवून जमीन सपाटीकरण करत असताना, त्याचा अचानक तोल गेला आणि तो ट्रॅक्टरवरून पडून रोटरमध्ये सापडला.

घटना घडल्यावर त्याची माहिती आजुबाजूच्या शेतकरी, नातेवाईक, कामगारांना कळली तेव्हा ते घटनास्थळी आले. योगेशला रोटरमधून बाहेर काढ्यात आले परंतु तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तशाच अवस्थेत यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून योगेशला मृत घोषित केले. या घटनेबाबत राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात सहा. निरीक्षक विजय पाचपोळे, पो.हवालदार मोहन तायडे, राजेंद्र पवार पुढील तपास करीत आहेत.







