Jalgaon News: जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यात आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक वादात झाले, वादातून एका डॉक्टरवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून त्यानंतर हल्ला करणाऱ्या संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला. आणि काही वेळातच नगरदेवळा स्थानकाजवळील रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, भडगाव पोलिसांसह रेल्वे पोलीस (जीआरपी) या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
घटना अशी घडली
प्राथमिक माहितीनुसार, संभाजीनगरातील डॉ. समाधान पाटील आणि रवींद्र महाजन यांच्यात काही दिवसांपासून आर्थिक व्यवहारावरून मतभेद होते. शुक्रवारी सायंकाळी हा वाद डॉक्टरांच्या रुग्णालयात पोहोचला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे बोलले जाते. यावेळी रवींद्र महाजन याने धारदार शस्त्राने डॉ. पाटील यांच्या हातावर वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात डॉ. पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्हिडिओनंतर रेल्वे मार्गावर मृतदेह आढळला.
रेल्वे रुळावर मृतदेह
हल्ल्याच्या घटनेनंतर रवींद्र महाजन याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्या व्हिडिओतील मजकूर, त्यामागील परिस्थिती आणि तो संपूर्ण घटनाक्रमाशी कितपत संबंधित आहे, याची पडताळणी सुरू आहे. व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काही वेळातच नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख रवींद्र महाजन अशी पटली. प्राथमिक माहितीनुसार रेल्वेखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, हा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

रेल्वेच्या जीआरपीकडे तपास
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, मृतदेह आढळलेले ठिकाण रेल्वे हद्दीत येत असल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाचा अधिकार रेल्वे पोलीस (जीआरपी) चाळीसगाव आहे. त्यामुळे आवश्यक नोंदी करून प्रकरण पुढील तपासासाठी रेल्वे जीआरपीकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहाराचे स्वरूप काय होते, दोघांमधील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओचा घटनाक्रमाशी काय संबंध आहे, तसेच डॉक्टरवरील हल्ला आणि त्यानंतर घडलेल्या रेल्वे मार्गावर आढलेल्या मृतदेहामागील सर्व परिस्थितीचा तपास रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे. तपासानंतर प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.










