Nashik News: शहरातील खराब रस्त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या असून वाहनधारकांना खड्डे वाचवत आणि नागरिकांना मुठीत जीव धरून ये-जा करावी लागत आहे. नाशिकच्या खड्ड्यावरून थेट मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी दर्शविली आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासन आणि महापालिकेच्या कारभारावर तीव्र नापसंती दर्शविली आहे. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांच्या दिलेल्या प्रतिक्रियेवर आपले स्पष्टीकरण दिले, ते म्हणाले की यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाले का? असा सवाल करुन आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, खड्ड्यावरून युतीतील दोन्ही मंत्र्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही मंत्र्यांमध्ये संवाद नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा असून, अनेक कार्यक्रमात देखील दोन्ही मंत्री एकमेंकाना टाळतांना दिसतात, अशी चर्चा आहे.
भुजबळांनी घेतले मनपा प्रशासनाला फैलावर
नाशिकमधील खड्ड्यांचा विषय राज्यभर गाजत आहे. नाशिककरांची जीव जात आहे. या अपघातांवर बोलताना छगन भुजबळ यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले आहे. मंत्री भुजबळ यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रस्त्यांच्या कामातील निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले होते. “एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही.” भुजबळांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. भुजबळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी केली होती.यावर आता गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले होते.
नाशिककरांना त्रास होईल हे सांगितलेले: महाजन
भुजबळ यांच्या प्रतिक्रियेनंतर मंत्री महाजन म्हणाले “जबाबदारी माझी आहे, ‘मी कुंभमेळा मंत्री आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती का? नाशिककरांना त्रास होणार आहे, हे मी सांगितले होते. डांबरी रस्ते टिकत नाहीत, त्यामुळे व्हाइट टॉपिंग करत आहोत. चाळीस हजार कोटी खर्च करून चेहरा मोहरा बदलत आहे. एका रोडखाली सात प्रकारची युटिलिटी करत आहोत. कॅमेरे लावत आहोत. येणाऱ्या सहा महिन्यात कामे पूर्ण होतील. नाशिककर म्हणतील, आमच्या शहरासारखे शहर नाही,”

मंत्री भुजबळ आणि महाजन यांच्यात का हा दुरावा?
दरम्यान, हे राज्यातील युती सरकारमधील दोन्ही महत्त्वाचे नेते आहे, त्यांच्यात नाशिकच्या खड्ड्यावरून वादंग सुरू आहे. कारण ही तसेच आहे. नाशिकमधील खड्ड्यांमुळे नाशिकरांचे जीव जात असतांना शांत असलेले भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरून छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली आहे. त्यांच्यात फारसा संवाद नाही, असे सांगण्यात येत असले तरी मंत्री भुजबळांनी महापालिकेला जबाबदार धरले आहे. भुजबळ मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत असतांना मंत्री गिरीश महाजन पालिकेवर होणाऱ्या टीकेनंतर बचावासाठी मैदानात आहे. दोन्ही मंत्री फारसे एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करतांना यापूर्वी कधी दिसले नाही. मात्र, आता दोन्ही नेते समोरासमोर सवाल उपस्थित करत आहेत.
मुद्दा आता नाशिककरांच्या जीवावर बेतला आला आहे. त्यामुळे दोन्ही मंत्री आपापली भूमिका मांडताना दिसत आहे. यापूर्वी हे दोन्ही नेते फारसे एकमेकांशी बोलत नव्हते. यापूर्वी गंगागोदावरी नदीतीरी ध्वजस्तंभ उदघाटन कार्यक्रमात मंत्री भुजबळ दिसले नव्हते, त्यानंतर देखील एकाच व्यासपीठावर ते जास्त दिसले नाही, भुजबळ यांच्यासारखे जेष्ठ मंत्री नाशकात असतांना गिरीश महाजन यांच्यावर कुंभमेळ्याची जवाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे महाजन आणि भुजबळांचे फारसे सूत जुळत नसल्याचे सांगितले जाते. तर, ‘हे सगळे चित्र माध्यमांनी तयार केल्याचे भुजबळांनी सांगितले. नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात दोघे एकत्र दिसले होते, मात्र त्याआधी दोघांचे फारसे जमत नव्हते. आता चर्चा अशी आहे की, जिथे आग लागते तेथेच धूर निघतो.










