Jalgaon News: ग्रामीण भागातील बॉक्सिंग खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची ग्वाही जिल्ह्याचे नवनियुक्त क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी यावेळी दिली. बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जळगाव बॉक्सिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर, उपाध्यक्ष धनराज कासट, नरेंद्र मोरे, सचिव चुनिलाल गुप्ता, सहसचिव दीपक वाल्डे यांच्यासह संतोष सुरवाडे, मनोज सूर्यवंशी, नयन राणे, भूषण पाटील आणि तुकाराम सोनवणे उपस्थित होते.
या भेटीदरम्यान जळगाव जिल्ह्यात बॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण व स्पर्धांच्या माध्यमातून अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते जिल्ह्याचे तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करू शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांची बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन जिल्ह्यात बॉक्सिंग खेळाचा प्रचार व प्रसार करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे तसेच बॉक्सिंग खेळाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.










