Jalgaon News: जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. योगेश भावालाल पाटील (३७) असे संबंधित मृत शेतकऱ्याचं नाव असून तो भागदरा शिवार येथील रहिवासी आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
दुर्दैवी घटना, शेतीच्या मशीनमध्ये अडकला
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील भागदरा येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांसोबत बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याचं समोर आले. येथील शेतकरी दिशेन महाजन यांच्या शेतामध्ये मका काढणीचे काम सुरू होते. या दरम्यान, योगेश पाटील हे स्वत: मशीन चालवत होते. काम करत असतांना ते अचानक मशीनमध्ये अडकले गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मका काढणी मशीन चालवून योगेश पाटील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
योगेश पाटील हे अत्यंत कष्टाळू होते. संसाराचा गाडा ओढण्यासाठी ते अपार कष्ट घेत मात्र, आजच्या अचानक या दुर्घटनेत ते गेल्यानं.त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगेश पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबाच्या उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान वयातच तीन मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस तपास करत आहेत.










