Cashless medical treatment scheme : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या ‘गोल्डन अवर’मध्ये उपचारांचा खर्च अडसर ठरू नये, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थात नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
इतकेच नव्हेतर, अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून वाचविणाऱ्या मदतनीसाला ‘राहवीर’ म्हणून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अपघातग्रस्तांसाठी दिलासादायक चित्र निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण ६१ दुरुस्त्या करण्यात आल्या असून, यामुळे वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे.
तातडीने उपचार मिळण्याचा मार्ग आता झाला मोकळा
या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेमुळे अपघातातील जखमी आणि त्यांच्या नातेवाइकांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अपघातानंतर उपचारासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी होणारी धावपळ, कर्ज काढण्याची किंवा दागिने गहाण ठेवण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येते; मात्र, या योजनेमुळे अशी परिस्थिती टाळता येणार आहे.
प्राण ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच…
प्राण ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच राष्ट्रीय स्तरावर लागू केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
हिट अँड रन : मृतांच्या वारसांना २ लाख भरपाई
हिट अँड रन प्रकारातील अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित मृताच्या वारसांना २ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या तरतुदीमुळे अशा अपघातांतील पीडित कुटुंबांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून, न्याय व मदतीची प्रक्रिया अधिक बळकट होणार आहे.










