Mumbai Mayor Election 2026: मुंबईकरांना नवीन महापौरांसाठी करावी लागणार प्रतिक्षा, ‘या’ कारणामुळे निवडणूक लांबणीवर
Mumbai Mayor Election 2026: देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत निकाल लागून 10 दिवस उलटले आहेत. निकालानंतर, महापौर पदासाठी आरक्षण देखील पार पडले. मात्र, मुंबई महापौर पद निवडीबाबात कासव गतीने हलचाली सुरु आहे. त्यातच महापौर निवडीबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 31 जानेवारी 2026 रोजी होणारी महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार, नवीन महापौर निवड आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. महायुतीतील घटक पक्षांची अद्याप विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट नोंदणी केली नसल्याने महापौर पदासाठीच्या निवडप्रक्रीयेला उशीर होत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप हा सर्वाधिक 89 जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेने (शिंदे गट) 29 जागा जिंकल्या आहे. निकालानंतर, महापौर पदासाठी आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीनुसार, मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग – महिला या गटासाठी आरक्षित झाले आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीसाठी महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते. गट नोंदणी झाल्यानंतरच पक्षादेश (व्हीप) लागू करता येतो. परंतु याठीकाणी गट नोंदणीचा पेच कायम आहे.
तर दुसरीकडे महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरून महायुतीत अद्यापही ठोस निर्णय झाला नसून ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.
अशी होते महापौरांची निवड
मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार, महापौर निवडसाठी
पालिका सचिव आयुक्तांशी चर्चा करून निवडणुकीची तारीख निश्चित केली जाते. तारीख निश्चित झाल्यानंतर, एक विशेष सभा बोलावली जाते. नियमानुसार, सर्व नगरसेवकांना किमान 3 दिवस आधी या सभेची सूचना देणे बंधनकारक असते. यानंतर इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज भरता येतो. या अर्जावर एका नगरसेवकाची सूचक आणि दुसऱ्याची अनुमोदन म्हणून स्वाक्षरी लागते. यानंतर महापौर निवडणुकीच्या दिवशी पीठासीन अधिकारी सभेचे कामकाज पाहतात. महापौर पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील, तर हात उंचावून किंवा गुप्त मतदान(प्रक्रीयेनुसार) घेत महापौर निवड केली जाते.









