Chopada Accident News: चोपडा तालुक्यातील घार्डी फाट्याजवळ शनिवारी सकाळी ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरी दोघं पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. यातील पुत्र हा त्याच्या वडिलांना उपचाराठी दुचाकीवरून जळगावात घेऊन जात होता. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घतला. या पिता-पुत्राला अज्ञात ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोहम्मद लुकमान ठोके (३९) आणि त्यांचे वडील लुकमान खा मुसे खा ठोके (७५) या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मयत हे लासूर येथील रहीवासी होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लासूर येथील रहिवासी लुकमान खा मुसे खा ठोके (वय ७५) यांची प्रकृती बरी नसल्याने, त्यांचा मुलगा मोहम्मद लुकमान (वय ३९) हा त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जळगावकडे घेऊन येत होता. दोघेही दुचाकीने लासूरवरून जळगावकडे येत होता. दरम्यान, सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दोगे पिता-पुत्र घार्डी फाटा परिसरात पोहचले असता समोरून येणाऱ्या एका अज्ञात ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत दोघांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मयतांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी करत आक्रोष केला. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
भंगार विक्रीच्या व्यवसायातून करत होते उदरनिर्वाह
मयत मोहम्मद लुकमान यांची आर्थिक परिस्थिती हालाकिची आहे. ते भंगार विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मोहम्मद लुकमान यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आधार हरपला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारवड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.








