LPG Shortage: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपुर्ण जगात इंधनचा तुटवडा जाणवत आहे. भारतालाही या युद्धाची झळ बसली असून इंधन पुरवठा आणि गॅस टंचाईचा सामना देशाला करावा लागत आहे. अद्यापही घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या एजन्सीबाहेर रांगा पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्य नागरीकांसह अनेक हॉटेल व्यवसायिकांच्या उद्योगावरही याचा परिणाम झाला आहे. गॅस सिलेंडरसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत असल्याने नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे.
एकीकडे शासनाकडून घरगुती गॅसमध्ये कुठेही कमतरता नसल्याचे सांगितले जाते, पुरवठा अधिकाऱ्यांकडून तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र, वस्तूस्थिती आजही वेगळीच आहे. गॅस सिलेंडरसाठी नागरीकांची फरफट कायम आहे. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस मिळत नसल्याने एका ग्राहकाने चक्क स्वत:चं डोकं फोडून घेतलंय.
संभाजीनगर शहराजवळच्या वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीमध्ये गुरुवार 16 एप्रिल 2026 रोजी हा प्रकार घडला आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्याने एका व्यक्तीने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतले. बालचंद नेमाने (वय 50,रा. रांजणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. घरी बायकोला काय सांगू? असे म्हणत त्यांनी स्वतःचे डोके फोडून घेतल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या घटनेनं गॅस एजन्सीबाहेर चांगलाच गोंधल उडाला होता. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरील व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवलं आहे. मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांची गॅस सिलेंडरसाठी होत असलेली कोंडी समोर आली आहे.










