JDCC Bank Election 2026: सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २१ जागांसाठी ही निवडणूक होणार असून २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार, २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
‘या’ कालावधीत घेता येईल अर्ज मागे
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नव्या नियमांचा १० दिग्गजांना बसणार फटका
नव्या सहकारी तरतुदीनुसार, सलग दहा वर्षांचा संचालकपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे विद्यमान चेअरमन संजय पवार, संचालक तथा आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अमोल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड. रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि माजी चेअरमन अॅड. रोहिणी खडसे या दहा दिग्गजांना निवडणूक लढविता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
या नेत्यांना निवडणुकीत सहभागी होता येणार नसल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच विविध राजकीय पक्षांना आपापले समर्थक उमेदवार पुढे करण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
असा आहे जिल्हा बँक निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल: २६ ते ३० ऑक्टोबर
अर्जांची छाननी: २ नोव्हेंबर
उमेदवारांची यादी प्रसिद्ध: ३ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज माघारी: ३ ते १७ नोव्हेंबर
अंतिम उमेदवार यादी: १८ नोव्हेंबर
मतदान: २९ नोव्हेंबर
मतमोजणी व निकाल: ३० नोव्हेंबर










