Yeola News: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य वितरण आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, तसेच येवला मतदारसंघातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
येवला संपर्क कार्यालयात मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती आणि विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, तहसीलदार आबा महाजन, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, निफाडच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हिमांशु चव्हाण, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अधिग्रहण करावे
मंत्री श्री. छगन भुजबळ म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीचा विचार करून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी, बोअरवेल व अन्य पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार अधिग्रहणाची कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती तपासून संभाव्य टँकर मागणीचा आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासह दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक उपाययोजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतिमान ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या दृष्टीने चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे. वनविभागाच्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी नियमानुसार चारा लागवडीची शक्यता तपासावी. तसेच आवश्यक नियम व परवानग्यांच्या अधीन राहून मेंढपाळ आणि चराऊ जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा आढावा
येवला व ३८ गावे, राजापूर व ४० गावे, धुळगाव व १६ गावे तसेच विंचूर-लासलगावसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या रेट्रोफिटिंगच्या कामांसह प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. येवला व निफाड तालुक्यातील शेती व ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा आढावा घेत नादुरुस्त रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्याच्या कामांचा आढावा
याशिवाय लासलगाव येथील घरकुल आवास योजना, शहरातील कचरा डेपोसाठी पर्यायी जागा निश्चित करणे, पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रस्ता, लासलगाव-विंचूर चौपदरी रस्ता आणि खेडलेझुंगे येथील काँक्रीट रस्त्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव येथील शीव नदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी संवर्धनाच्या कामांचीही माहिती घेण्यात आली. प्रलंबित बाबींची पूर्तता करून संबंधित विकासकामांना गती द्यावी आणि नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.








