ST Mahamandal: दिवाळी आता अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या अनुषंगाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण आनंदामध्ये जाण्यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळात सध्याच्या घडीला तब्बल ८० हजाराच्यावर अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसने गोड होणार आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्याचा वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश मंत्री. प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.
दरम्यान, दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ- नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, त्याकरिता प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी महामंडळाच्या अर्थ व नियोजन खात्यानं समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल, या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले.

एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या साधारणत:10 तारखेच्या आत होते. यंदा दिवाळी सणाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरूवात होत आहे. तोडांवर आलेली दिवाळी त्या अनुषंगाने एसटीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय झाला आहे. कर्मचार्यांना सणापूर्वीच वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या सणासाठी कुटुंबीयांसह खरेदी आणि इतर नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्याची गरज लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला वेतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे.











