महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन अन् निर्यातीचे केंद्र बनेल- मुख्यमंत्री फडणवीस..ज्वेलरी उद्योगात २५ हजार कोटींची गुंतवणूक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
maharashtra will become a global hub for jewellery manufacturing and exports
Chief Minister Fadnavis, india jewelry park project, dcm ennatha shinde, mahape project, idian bulian market, gold and silver market, मुख्यमंत्री फडणवीस, इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्प, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापे प्रकल्प, इंडियन बुलियन मार्केट, सोने आणि चांदीची बाजारपेठ,
Thane News : मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शासन व उद्योग यांच्या समन्वयातून ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी, उपाध्यक्ष शौनक पारिख आदी मान्यवर उपस्थित होते
महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याला जागतिक संधींची जोड
मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि व्यावसायिकतेची जागतिक स्तरावर ओळख आहे. रत्न व आभूषण उद्योगासाठी आवश्यक असलेले कुशल कारागीर, उद्योजकता, व्यापाराचे अनुभवसंपन्न जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याला जागतिक दागिने उद्योगातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याची संधी इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
जागतिक व्यापाराशी जुळवून घेण्याचे आवाहन
जागतिक स्तरावरील बदलती परिस्थिती आणि अमेरिका व चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत उद्योगांनी बदलत्या बाजारपेठांचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. इंडिया ज्वेलरी पार्क या बदलांना सामोरे जाण्यासाठी दागिने उद्योगाला आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
ज्वेलरी पार्क उद्योगाच्या भविष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा
महापे येथील २२ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. हा प्रकल्प उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. आजपासून ३० ते ४० वर्षांनंतर मागे वळून पाहताना इंडिया ज्वेलरी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे निश्चितपणे स्मरण केले जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
उद्योग उभारणीसाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, वीज, पाणी, रस्ते, भांडवल, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक आहे. इंडिया ज्वेलरी पार्कच्या कामात कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि उद्योग यांच्यातील समन्वय व भागीदारी महत्त्वाची आहे. उद्योगांच्या गरजा समजून घेऊन आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत महाराष्ट्राचे योगदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी उत्पादन, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. भारत पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्रही एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इंडिया ज्वेलरी पार्कसारखे प्रकल्प या आर्थिक वाटचालीला बळ देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
ज्वेलरी उद्योगात २५ हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होतील. महापे येथील २२ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणारे हे अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील रत्न व आभूषण उत्पादन, व्यापार आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या झवेरी बाजाराला रत्न व आभूषण व्यापाराचा समृद्ध इतिहास असून, बीकेसी येथील भारत डायमंड बोर्स आणि सीप्झसारख्या केंद्रांनी मुंबईला जागतिक हिरे व्यापार आणि दागिने निर्यातीच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. देशाच्या एकूण रत्न व आभूषण निर्यातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक निर्यात महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबईतून होते. या उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने जेम्स अँड ज्वेलरी धोरणाच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे, पाच लाख रोजगार निर्माण करणे आणि राज्यातील रत्न व आभूषण निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये दोन हजारांहून अधिक उत्पादन युनिट्स सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक वीज, पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, कामगारांच्या निवासाची व्यवस्थाही विचारात घेण्यात आली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी आणि प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
इंडिया ज्वेलरी पार्कमुळे नवी मुंबईचे जागतिक महत्त्व वाढणार
– वनमंत्री गणेश नाईक
औद्योगिकीकरणातून निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा, या दृष्टीने शासनाच्या विविध यंत्रणा योग्य दिशेने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. भविष्यात नवी मुंबईची ओळख डेटा सेंटर हब म्हणून निर्माण होण्याबरोबरच इंडिया ज्वेलरी पार्कमुळे जागतिक स्तरावर या शहराचे महत्त्व अधिक वाढणार आहे. राज्यासमोर नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेच्या लाटेसारखी आव्हाने असतानाही शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना शाश्वत जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचा शासन प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.
रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि रत्न व आभूषण उद्योगाच्या विकासातील त्याचे महत्त्व विशद केले.










