Jalgaon News: देशभरातील गुर्जर समाजातील अधिवक्त्यांना एका व्यासपीठावर आणणारी (‘GA 500 Gurjar Advocates’)ची ८ वी राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्स रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईज येथे उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय परिषदेला देशाच्या विविध राज्यांतून सुमारे २०० गुर्जर अधिवक्ते सहभागी झाले होते. कायदे क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण, समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी अधिवक्त्यांची भूमिका तसेच शेतकरी व समाजातील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन या विषयांवर परिषदेत सखोल विचारमंथन झाले.
परिषदेला महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी राज्य माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, दिल्ली बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲड. राजपाल कसाना, ॲड जी. एस. आवाना, ॲड. इंकलाबी, ॲड. भारत भूषण यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
लोकशाही जिवंत ठेवण्यात अधिवक्त्यांचं योगदान महत्त्वाचं
परिषदेत बोलताना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी लोकशाही व्यवस्था मजबूत ठेवण्यात अधिवक्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं. “लोकशाही जिवंत ठेवण्यात अधिवक्त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यात वकिलांची महत्त्वपूर्ण भूमिका असते,” असे त्यांनी नमूद केले.
राजकारणी आणि अधिवक्ते यांच्यातील जवळच्या संबंधांचा उल्लेख करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही अनेक वेळा अधिवक्त्यांची गरज भासते. कायदेविषयक बाबींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळणं हे सार्वजनिक जीवनात अत्यंत महत्त्वाचं असतं .
विधिमंडळात कायदे केले जातात; मात्र त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावून ते समाजाच्या उपयोगात आणण्याचं महत्त्वाचं कार्य न्यायव्यवस्था करते आणि न्यायव्यवस्थेला कायद्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची भूमिका अधिवक्त्यांची असते. त्यामुळे समाजाच्या दृष्टीने अधिवक्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्यांदाच राष्ट्रीय परिषद अनुभवण्याचा आनंद
जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेत जम्मू-कश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात यांसह देशातील विविध राज्यांतील गुर्जर अधिवक्ते सहभागी झाल्याचा उल्लेख गुलाबराव पाटील यांनी केला. “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गुर्जर अधिवक्त्यांची अशी राष्ट्रीय कॉन्फरन्स अनुभवण्याची संधी मिळाली. याचा मला विशेष आनंद आहे,”अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
देशाच्या विविध भागांतून अधिवक्ते जळगावमध्ये एकत्र आल्याने या परिषदेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. कायदे क्षेत्रासोबतच समाजाच्या विविध प्रश्नांवर अधिवक्त्यांनी एकत्रितपणे विचार करणे ही सकारात्मक बाब असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं.
समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवर भर
परिषदेत ॲड. भगवान पाटील यांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष भर दिला. समाजातील बुद्धिजीवी आणि अधिवक्ता वर्गानं एकत्र येऊन समाजाला योग्य दिशा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत आणि मार्गदर्शन मिळालं, तर एका विद्यार्थ्याच्या प्रगतीमुळे संपूर्ण कुटुंबाची आणि पुढे समाजाची प्रगती होते. त्यामुळे समाजानं आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
विविध कायदेविषयक विषयांवर विधिज्ञांचं मार्गदर्शन
परिषदेत विविध कायदेविषयक विषयांवर मान्यवर अधिवक्त्यांनी आपले विचार मांडले. ॲड. जी. एस. आवाना यांनी रिट विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. इंकलाबी यांनी गुर्जर समाजाला आरक्षण मिळाल्यास भविष्यात त्याचा समाजाला कसा फायदा होऊ शकतो, याबाबत विचार मांडले. ॲड शाहिस्ता यांनी मुस्लिम लॉ संदर्भात मार्गदर्शन केलं, तर ॲड. जी. एम. पाटील यांनी समाज संघटनेच्या गरजांवर मार्गदर्शन केलं.
यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या अनेक विधिज्ञांनी कायदे क्षेत्रातील अनुभव, सामाजिक प्रश्न आणि अधिवक्त्यांनी समाजासाठी बजावायची भूमिका यावर विचारांची देवाणघेवाण केली.

ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसह विविध विषयांवर चर्चा
परिषदेत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, ज्युनियर वकिलांच्या हितासाठी विविध योजना राबविणे, समाजातील वंचित व शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपाययोजना करणे तसेच समाजाला संघटित करण्यासह कायदे क्षेत्रातील विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. कायदे क्षेत्रात काम करणाऱ्या ज्युनियर अधिवक्त्यांना आवश्यक सुविधा, मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. समाजातील कायदेविषयक प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी देशभरातील अधिवक्त्यांमध्ये समन्वय वाढविण्याचा सूर परिषदेत उमटला.
शेतकऱ्यांसाठी कायदेविषयक जनजागृतीची गरज
गुर्जर समाजाचा प्रमुख व्यवसाय असलेल्या शेती क्षेत्रातील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे, यासाठी शेतकऱ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांची, कायदेशीर प्रक्रियेची आणि उपलब्ध उपाययोजनांची माहिती मिळाल्यास त्यांना अनेक अडचणींवर मात करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अधिवक्त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका परिषदेत मांडण्यात आली.
वकिलांनी एकत्र येणे काळाची गरज
देशातील विविध राज्यांतून आलेल्या अधिवक्त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परस्परांशी जोडले जाण्याची आवश्यकता व्यक्त केली. राजकीय नेतृत्वाची भूमिका बदलत राहू शकते; मात्र अधिवक्ता आपल्या कायदेविषयक ज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी सातत्याने काम करू शकतो. त्यामुळे समाजाच्या विकासात अधिवक्त्यांनी अधिक सक्रिय भूमिका बजावण्याची गरज असल्याचं मत परिषदेत व्यक्त करण्यात आलं.
स्वातंत्र्यलढ्यातही अधिवक्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणं आजच्या काळातही कायदे क्षेत्रातील व्यक्तींनी समाजाच्या प्रश्नांसाठी पुढाकार घ्यावा, असा सूर परिषदेत उमटला.
देशभरातील गुर्जर अधिवक्त्यांसाठी संपर्काचे व्यासपीठ
(Unity – Profession – Justice) आणि (Service – Harmony – Nation Building) या संकल्पनांवर आधारित या परिषदेमुळे देशातील विविध राज्यांतील गुर्जर अधिवक्त्यांना परस्परांशी जोडण्याचं प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झालं. कायदे क्षेत्रातील सहकार्य वाढविणं, समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करणं, ज्युनियर अधिवक्त्यांच्या प्रश्नांवर काम करणे आणि सामाजिक उन्नतीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला.
जळगावच्या भूमीत पार पडलेल्या या राष्ट्रीय परिषदेला मिळालेला प्रतिसाद पाहता GA 500च्या माध्यमातून गुर्जर अधिवक्त्यांची राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे अधिवेशन महत्त्वाचे पाऊल ठरले, अशी भावना उपस्थित अधिवक्त्यांनी व्यक्त केली.










