MP Update: कधी कधी एखाद्या घटनेकडं आपण शुल्लक घटना म्हणून बघतो. मात्र, त्यातून सजग होत नाही. त्या घटनेमुळं आपल्या जीवावर देखील बेतू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे. गुटखा खाऊन ११ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर थुंकल्यावर एका वृद्ध व्यक्तीला वीजेचा प्रचंड मोठा शॉक बसला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घराजवळ असलेल्या या वीज वाहिनीमुळं घडलेल्या घटनेनं वीज विभागावर संताप व्यक्त होत आहे.
घटना अशी
मिळालेली माहिती अशी की, ही घटना मध्यप्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात घडली आहे. गंजबसोडा येथील गायत्रीनगर वॉर्ड ६ मध्ये घडलेल्या या घटनेत मूळचे छतरपूर येथील असलेले ६५ वर्षीय प्रभुलाल गुप्ता यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ते गेल्या १० वर्षांपासून गायत्री नगरमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. घराच्या तिसऱ्या मजलव्यावरी बाल्कनीमध्ये उभे होते, गुप्ता हे बाल्कनीजवळून खाली थुंकताना वीज वाहिनीच्या संपर्कात आल्यानं जोरदार विजेचा धक्का बसून या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणाहून ते थुंकण्याचा प्रयत्न करत होते, त्या ठिकाणी ११ केव्ही उच्च दाबाच्या वाहिनीमधून वीज प्रवाह सुरू होता त्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने ही दुर्घटना घडली.
वीजेचा पुरवठा बंद करण्यात आला
दरम्यान, घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी ११२ वर संपर्क साधून पोेलिसांना बोलावलं. या घटनेनंतर सगळ्या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. लोकांनी गर्दी केली. त्यानंतर काहीजणांनी वीज विभागाला कळवलं आणि मग वीजेचा पुरवठा बंद करण्यात आला. पोलिस दाखल झाल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करुन पार्थिव खाली उतवण्यात आलं. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, घरमालक पद्मा चिधर यांनी संतप्त प्रतिकिया व्यक्त केली आहे. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना तार हटवण्याची वारंवार विनंती करण्यात आली पण आजपर्यंत ही धोकादायक तार हटवली नाही. केवळ आमची बोळवण केली. ही तार हटवली असती तर आजही दुर्घटना घडली नसती असे ते म्हणाले.











