Jalgaon News: सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून देशाच्या एकतेचा भक्कम पाया रचला. त्यामुळेच त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी एकत्रित राहून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल, असे मत छावा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लेवा भवन येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी सरदार पटेल यांच्या कार्याला उजाळा देतांना कोल्हे बोलत होते.
याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष विद्या झनके, जिल्हा उपाध्यक्ष निलू इंगळे, ज्योती खरे, महानगर सचिव हितेंद्र टेकावडे, महानगर सचिव नंदू बडगुजर, महानगर सह सचिव चंद्रशेखर महाले, मनोहर बडगुजर, आनंद महिरे, भीमराव सोनवणे, गुरुनाथ सैंदाणे, सागर साळुंखे, योगेश चौधरी, सुधाकर पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुष्काळानिमित्त सामाजिक उप्रक्रम
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे म्हणाले की, यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेता संघटनेच्या वतीने कोणतेही बॅनर लावण्यात आलेले नाहीत. तसेच शोभायात्रा, मिरवणूक किंवा रॅलीचे आयोजनही करण्यात आलेले नाही. अशा कार्यक्रमांवर होणारा खर्च समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरण्याचा संघटनेचा निर्णय आहे. असं सांगितलं.










