Member of the Legislative Assembly Election: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असतानाच युती आणी आघाडीला बंडखोरीचं ग्रहण ही लागलं. या बंडखोरीनं अनपेक्षित निकालाची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळं यंदा लढती चुरशीच्या ठरणार हे स्पष्ट होतं. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठी महायुती विरुद्ध आघाडी असा सामना होता. त्यामुळं आजच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यात ५ पैकी दोन जागांचा निकाल जाहीर झाला असून पुणे शिक्षक मतदारसंघातुन भाजपनं सर्व शक्ती लावल्यानं अपेक्षेप्रमाणं भाजचे कौस्तुभ गावडे यांचा विजय झाला आहे. अद्याप तीन मतदार संघांचे निकाल येणं बाकी आहे.
तसेच पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचा पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात लढत होती. तर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) प्रतापसिंग पाटील यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे व काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) हर्षदा जाधव यांच्यात लढत आहे.
तर, अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक, अदिती पोहरे, संगिता शिंदे आणि दत्तात्रय लहाने हे उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अजूनही मतमोजणी सुरु आहे. याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.









