Crime News: जळगाव तालुक्यातील भोकर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील भारतीय स्टेट बँक शाखेवर शनिवार, 31 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी बँकेतील व्यवस्थापक आणि रोखपालला शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण करून खुर्चीला बांधले आणि रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटून नेले. दरम्यान, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे 4 दरोडेखोरांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दुचाकींवरून सशस्त्र दरोडेखोर अचानक भोकर येथील स्टेट बँक शाखेत घुसले. आत शिरताच त्यांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखविला. त्यानंतर, बँक व्यवस्थापक आणि रोखपालला मारहाण करत खुर्चीला बांधून ठेवले आणि तिजोरीतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने आपल्याकडील बॅगांमध्ये भरून दुचाकींवरून जळगावच्या दिशेने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडले 3 दरोडेखोर
भोकर येथील भारतीय स्टेट बँक शाखेवर दरोडा टाकून दरोडेखोर जळगावच्या दिशेने जात असताना डिकसाई गावाजवळ थांबले. दरोडेखोरांच्या संशयास्पद हालचाली दिसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दरोडेखोरांना हटकले. ग्रामस्थांनी धाडस दाखवत एका दरोडेखोराला जागीच पकडून बेदम चोप दिला. पाठोपाठ इतर ठिकाणी आणखी दोन दरोडेखोरांना पकडण्यात यश आले. पकडलेल्या संशयितांकडून लुटलेल्या रकमेच्या बॅगाही जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या संशयित आरोपींमध्ये नायडोंगरी तालुका चाळीसगाव येथील खुनाच्या आरोपात नुकताच जामीन झालेला एकाचा तसेच दुसरा बऱ्हाणपूर येथील असल्याची माहिती आहे. फरार एका दरोडेखोराचा जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे पथक शोध घेत आहेत. उर्वरित फरार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी करून कसून तपास सुरू केला आहे. दरोड्यात नेमकी किती रोख रक्कम आणि किती किमतीचे सोने लुटले गेले, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नसून बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.










