Mumbai News: महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांना शेती करणं कठीण झालं आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, आता चौथी यादी जाहीर झाली असून त्यात ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. दिवाळी सणाच्या तोंडावर आणखी ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असल्यानं सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी राज्यातील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचा तिसऱ्या यादीत समावेश होता. आता दिवाळीपूर्वी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. थकीत कर्जदार असलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मोठा मिळाला आहे. एकूण ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळाली. तसा ४ हजार कोटींचा प्रस्ताव सहकार खात्यानं वित्त विभागाला दिला आहे. शासनानं २५ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला असून ६ लाख २७ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्य शासनानं आजपर्यंत कर्जमाफी योजनेद्वारे १३ हजार २७५ कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे.
४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना फायदा
केवायसी केलेले पण कर्जमाफीचा लाभ न पोहचलेल्या शेतकऱ्यांना दिवाळपूर्वी मदत मिळणार असून अद्यापही साडेचार लाखांवर केवायसी होणे बाकी असल्याची समाजतं. एकीकडं दुष्काळामुळे शेतकरी हवालदील झाला. यंदा त्याची अवस्था दयनीय आहे. त्यामुळं शेतकरी सरकारच्या भरवश्यावर आहे. त्या अनुषंगानं ही चौथी यादी सरकारनं जाहीर केल्यानं त्याचा ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून तातडीने नजीकच्या ‘आपले सेवा केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करून घ्यावे आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.
दोन लाखांच्या पिक कर्जाला माफी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषांनुसार राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी आहे: कालावधीचा निकष हा १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जाचा समावेश आहे. कर्जमुक्तीची मर्यादा ही २ लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जांसह पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना या योजनेअंतर्गत संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत.

फायनान्स कंपन्यांना तंबी, शेतकऱ्यांना ५ हजारांची अग्रीम मदत
दरम्यान, सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही दिलासा दिला असून दिड कोटी शेतकऱ्यांना अग्रीम ५ हजार रुपये दुष्काळी मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन तसे स्पष्ट केलं. त्यासाठी ७५०० कोटी रुपये खर्च होणार असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. कर्ज बाजारी शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीबाबत मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळजन्य परिस्थितीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मागे पैशासाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं कळतं.








