Tukaram Mundhe FDA Notice Ajay Devgn: महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढें हे आपल्या बेधडक कारवाईसाठी ओळखले जातात. FDA चा पदभार स्विकारल्यापासून त्यांनी भेसळखोरांना पळता भुई थोडी करुन सोडले आहे. आता त्यांच्या रडारवर पान मसाल्याच्या जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी असून या प्रकरणात त्यांनी संबंधीत सेलिब्रिटींना नोटीस पाठवल्या आहे. शातच, आता या प्रकरणाला नवं वळण लाभल्याचं पाहायला मिळतंय. पान मसाल्याची जाहिरात करणारे सेलिब्रिटी, टायगर श्रॉफ, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहे. कारणे दाखवा नोटीसला अजय देवगणनं उच्च न्यायालयात आव्हानं दिलं आहे. एफडीएच्या नोटीशीविरोधात उच्च न्यायालयात या प्रकरणावर 4 नोव्हेंबरला सुनावणी पार पडणार आहे. अशातच, आता तुकाराम मुंढेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उच्च न्यायालयात धाव घेतली असली, तरी एफडीए आपली कायदेशीर कारवाई थांबवणार नाही, ती अधिक तीव्र गतीने पुढे नेणार, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बॉलिवूड सेलिब्रिटी पुरते हादरुन गेले आहेत. अशात FDA नं पाठवलेल्या नोटीसला बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. अजय देवगणनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून कारणे दाखवा नोटीस मनमानी असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभुमीवर, मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “आम्ही या प्रकरणात तत्परतेने कारवाई सुरू केली असून संबंधित तिन्ही व्यक्तींना आधीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या तिघांनीही नोटिसांना उत्तर देऊन एफडीकडे काही वेळाची मुदत मागितली होती. यातील एका व्यक्तीने म्हणजेच अभिनेता अजय देवगण यानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. मात्र, न्यायालयानं एफडीएच्या कारवाईला कोणताही स्थगिती आदेश दिलेला नाही.
तसेच या प्रकरणात सक्षम अधिकारी असलेल्या साहाय्यक आयुक्तांनी सर्व कायदेशीर सुनावण्या पूर्ण करून या प्रकरणाची सुनावणी बंद केली आहे. आता पुढील ठोस निर्णयासाठी आणि दंडात्मक कारवाईसाठी हे संपूर्ण प्रकरण सहआयुक्तांकडे सोपवण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणातील याचिका प्रलंबित असली तरी एफडीएकडून नियमानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई निष्पक्षपणे सुरूच राहील…”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.








