Jalgaon News: किनगाव येथील दंगेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व युवा जिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हरकारे यांना निवेदन देण्यात आलं.
याप्रसंगी राज्याचे निवड समिती अध्यक्ष योगेश बाविस्कर, निरीक्षण समिती उपाध्यक्ष राजेंद्र बारी, युवा जिल्हाध्यक्ष मनोज पाटील तसेच संतोष चेलानी, जितेंद्र शर्मा, ईश्वर चावरे, अक्षय मराठे, हर्षल काळे, रोहित पाटील, सागर परदेशी, बालकृष्ण नावरकर, प्रज्ञा नावरकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
निवेदनाचा आशय असा
किनगाव येथील दंगेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. हे गाव अतिशय संवेदनशील आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ अतिशय शिस्तप्रिय आहे. शासकीय परवानगी घेतल्यानंतरच संचालनाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी दगडफेक होणे, हल्ला चढवणे, हिंसक वातावरण तयार करणे या गोष्टी योग्य नाही म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी व हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही झालीच पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रीय हिंदू संघटन १९ नोव्हेंबर २०२६ पासून शंखनाद करणार असून हिंदू राष्ट्र आंदोलनाची ही पहिली पायरी ठरेल. या आंदोलनाचे स्वरूप हे देशातील हिंदू विचार सरणी असलेल्या खासदारांना त्यांच्या कार्यालयात जाऊन संघटनतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. तो आवाज आपल्या संसदेत उठवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

किनगाव सारख्या हिंसक घटनांना पायबंद व्हावा म्हणून हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे, यासाठी या आंदोलनाची सुरुवात संपूर्ण देशामध्ये हिंदू संघटनेनं राष्ट्रीय स्तरावर सुरू केलेली आहे. असे सांगून राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रा. सुरेश वाघ यांनी राष्ट्रीय हिंदू संघटनेची भूमिका मांडली.










