Tamilnadu News: तामिळनाडूच्या तिरुपत्तूर जिल्ह्यात एक मोठा रेल्वेचा मोठा अपघात होता होता टळला आहे. जोलारपेट्टाई रेल्वे जंक्शनच्या यार्डमध्ये उभे असलेले सात रिकामे रेल्वे डबे इंजिनशिवाय अचानक पुढे चालू लागले. हे डबे सुमारे सहा किलोमीटरपर्यंत घरंगळत गेले आणि थामलेरी मुथूरजवळ मुख्य रेल्वे रुळावरून खाली घसरल्याचं सांगण्यात येतं. सुदैवानं मोठा अपघात टळला असून या घटनेनं रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नेमकी ही घटना कशी घडली? हलगर्जीपण की दुर्घटना यांची माहिती रेल्वेचे अधिकारी घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
घसरलेले डबे रुळांवरून हटवण्यासाठी गॅस कटर आणि जेसीबी मशीनचा वापर करून हटविण्यात आले.यावेळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी गॅस कटरच्या साहाय्यानं डब्यांमधील जोडणारे भाग वेगळे केले. त्यानंतर जेसीबी मशीनच्या साहाय्याने ते रेल्वे रुळांवरून बाजूला हटवण्यात आले.
घटना अशी
दरम्यान, मिळालेली माहिती अशी की, तामिळनाडूच्या तिरुप्पत्तूर जिल्ह्यात, जोलारपेट्टाई जंक्शनपासून इंजिनशिवाय सुमारे सहा किलोमीटर धावल्यानंतर सात रिकामे रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्यानं एक मोठा अपघात टळला आहे. हे डबे दुरुस्तीसाठी कोच मेंटेनन्स यार्डमध्ये उभे होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्यामुळे हे डबे स्वतःहून पुढे निघाले, ते सुमारे ६ किलोमीटर पुढे जाऊन रुळावरून घसरले, सुदैवानं कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. डब्यांचा वेगळाच आवाज ऐकू आल्यानं जवळच एका रेल्वे फाटकावर कर्तव्य बजावणाऱ्या गेटकिपरनं संबंधित प्रकार तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. या भरकटलेल्या डब्यांविषयी माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि संभाव्य टक्कर टाळण्यासाठी येणाऱ्या गाड्या विविध ठिकाणी थांबवल्या.

त्यांनतर, गॅस कटर व जेसीबी मशीनचा वापर करून डबे रुळांवरून काढण्यात आले. यावेळी गॅस कटरच्या साहाय्यानं डब्यांमधील जोडणारे भाग वेगळे करण्यात आले. या घटनेमुळे व्यस्त बंगळूर-चेन्नई मार्गावरील अनेक गाड्यांवर परिणाम झाला, ज्यामुळे जोलारपेट्टाई रेल्वे यार्डमधील सुरक्षा नियमावली आणि कामकाजाबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.









