Latest Weather News: अर्नब चक्रीवादळाचा कहर संपवत नाही तोच आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात खोल कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून गेल्या ६ तासांत ताशी २३ किमी वेगानं पश्चिम-वायव्य दिशेला ‘मुरासू’ Murasu) सरकले आहे. ते अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर ‘मुरासू’ या चक्रीवादळात झालं असून, आज, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता सुमारास ते नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात केंद्रित होते. हे चक्रीवादळ चेन्नई (तामिळनाडू) पासून सुमारे ५६० किमी तर, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) पासून ६६० किमी, नेल्लोरपासून ६३० किमी, मछलीपट्टणमपासून ६४० किमी आणि ओंगोलेपासून ६८० किमी अंतरावर आहे.
आंध्रातील या ठिकाणांना इशारा
हे चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेला सरकत २ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर ‘तीव्र चक्रीवादळात’ (Severe Cyclonic Storm) होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर, ते वायव्य दिशेला सरकत २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री (२३:३० वाजता) ते ३ नोव्हेंबर २०२६ च्या पहाटे (०४:०० वाजता) दरम्यान, नेल्लोर आणि नरसापूरच्या दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी असेल, जो अधूनमधून ताशी १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो.
आंध्रच्या किनारपट्टीला पावसाचा इशारा
किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशच्या भागाला १ नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २ नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर वाढून बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ व ४ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तमिळनाडूत २ नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर वाढून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
दक्षिण ओडिसा
२ नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी पावसाचा जोर वाढून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच रायलसीमा भागात २ आणि ३ नोव्हेंबर रोजी बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तेलंगणा
२ ते ४ नोव्हेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे; तसेच ३ नोव्हेंबर २०२६ रोजी काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.
छत्तीसगड
२ नोव्हेंबर रोजी दक्षिण छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
वाऱ्याबाबत इशारे- आग्नेय बंगालचा उपसागर
आग्नेय बंगालच्या उपसागरात सध्या ५५ ते ६५ किमी प्रति तास वेगाने (झोतासह ७५ किमी प्रति तास) वारे वाहत आहेत. १ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत हे वारे अधिक तीव्र होऊन ६५ ते ७५ किमी प्रति तास (झोतासह ८५ किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे, जो भाग आग्नेय आणि त्याला लागून असलेल्या नैऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत असेल. त्यानंतर वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होईल; २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ५० ते ६० किमी प्रति तास (झोतासह ७० किमी प्रति तास) वेगाने वारे वाहतील आणि त्यानंतर ते आणखी कमी होत जातील.

नैऋत्य बंगालचा उपसागर
सध्या येथे ६५ ते ७५ किमी प्रति तास (झोतासह ८५ किमी प्रति तास) वेगाने वारे वाहत आहेत. १ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे वारे अधिक तीव्र होऊन ८० ते ९० किमी प्रति तास (झोतासह १०० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे. २ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत, त्यानंतर वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होईल. २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत तो ५० ते ६० किमी प्रतितास (झोतांसह ७० किमी/तास) होईल आणि ३ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत ४० ते ५० किमी तास (झोतांसह ६० किमी/तास) इतका कमी होईल, त्यानंतर तो आणखी कमी होत जाईल.
पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर
येथे सध्या ६५ ते ७५ किमी/तास (झोतांसह ८५ किमी/तास) वेगाने वारे वाहत आहेत. १ नोव्हेंबरच्या रात्रीपासून हे वारे ८० ते ९० किमी तास (झोतांसह १०० किमी तास), २ नोव्हेंबरच्या सकाळपासून ९० ते १०० किमी तास (झोतांसह ११० किमी/तास) आणि २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत १०० ते ११० किमी तास (झोतांसह १२० किमी तास) वेगानं वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होईल. ३ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत तो ५५ ते ६५ किमी तास (झोतांसह ७५ किमी/तास) आणि ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील ६ तासांसाठी ४० ते ५० किमी तास (झोतांसह ६० किमी तास) इतका होईल, त्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.
आंध्रप्रदेश किनारपट्टी आणि लगतचा परिसर
आंध्र प्रदेश, उत्तर तामिळनाडू आणि पुंदुचेरीच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या भागात १ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून ४० ते ५० किमी तास (झोतांसह ६० किमी-तास) वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाऱ्याचा वेग वाढून २ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत ६५ ते ७५ किमी तास (झोतांसह ८५ किमी-तास), २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून ८० ते ९० किमी तास (झोतांसह १०० किमी-तास) आणि २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत १०० ते ११० किमी तास (झोतांसह १२० किमी-तास) इतका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होईल; ३ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत तो ५५ ते ६५ किमी-तास (झोतांसह ७५ किमी/तास) आणि ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पुढील ६ तासांसाठी ४० ते ५० किमी-तास (झोतांसह ६० किमी-तास) इतका होईल. आणि त्यानंतर त्यात घट होईल.
उत्तर तामिळनाडू- पुद्दुचेरी किनारपट्टी
१ नोव्हेंबरच्या दुपारपासून वादळी हवामान सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी (झोतासह ६० किमी) असेल. २ नोव्हेंबरच्या सकाळपासून हा वेग ताशी ५५ ते ६५ किमी (झोतासह ७५ किमी) आणि २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून ताशी ६० ते ७० किमी (झोतासह ८० किमी) इतका वाढण्याची शक्यता आहे, असे नवी दिल्लीस्थित भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञ उमाशंकर दास यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविलं आहे.









