Pune News: जेजुरी येथील पवित्र श्री खंडोबा मंदिरात ‘ईशा’च्या स्वयंसेवकांनी ‘कैलाश वाद्यम्’ हे पवित्र संगीत सादर केले, यावेळी त्यांनी भाविकांसमोर आदियोगी शिवाचे चैतन्य साकारले. या सादरीकरणासोबतच, भंडाराच्या सोनेरी रंगात सजलेल्या आदियोगींची एक भव्य मिरवणूकही काढण्यात आली, त्यामुळं या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. तत्पूर्वी, पुण्याच्या श्री सोमेश्वर मंदिरातही ‘कैलाश वाद्यम्’ सादर करण्यात आले आणि तिथेही आदियोगींची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
‘कैलाश वाद्यम्’ म्हणजे आदियोगी शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलाशावर वाजवले जाणारे संगीत. पवित्र वाद्यांच्या नादध्वनींद्वारे, ही प्राचीन संगीत परंपरा कैलाशाचे वातावरण पुन्हा निर्माण झाल्याची प्रचिती आली. पूर्णपणे भक्तीवर आधारित ‘कैलाश वाद्यम्’ साधकाला शिवतत्त्व किंवा ‘शिव अवस्था’ अनुभवण्यास मदत होते.
दक्षिण- पश्चिम संस्कृतींचा एक सुंदर संगम: पानसे
श्री खंडोबा मंदिरात झालेल्या या सादरीकरणाबद्दल बोलताना, ‘श्री मार्तंड देव संस्थान’चे अध्यक्ष ॲड. विश्वास गोविंद पानसे म्हणाले, “ईशाच्या ‘कैलाश वाद्यम्’ सादरीकरणाच्या माध्यमातून आम्हाला दक्षिण आणि पश्चिम भारताच्या संस्कृतींचा एक अतिशय सुंदर संगम पाहायला मिळाला. ईशाच्या स्वयंसेवकांनी ज्या प्रकारे एकत्र येऊन हे ‘कैलाश वाद्यम्’ सादर केले. ते खरोखरच अत्यंत विलोभनीय होते.”

कैलाश वाद्यम्’चे महत्त्व
‘कैलाश वाद्यम्’ पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले आहे. याची सुरुवात २८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात झाली, त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात हे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील या प्रवासाची सांगता पुण्याच्या श्री सोमेश्वर मंदिरात आणि जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात झालेल्या सादरीकरणाने झाली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून, भाविकांना प्रसाद म्हणून पवित्र रुद्राक्ष आणि विभूतीही देण्यात आली. या उपक्रमांच्या माध्यमातून, ‘कैलाश वाद्यम्’चा अनुभव महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमधील भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा ‘ईशा’चा मानस आहे.









