Pune News: पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षिततेच्या आणि पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आलेल्या विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षित भविष्याचा मजबूत पाया रचला जात आहे. स्व.अजित पवार यांनी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी १८० कोटी रुपये मंजूर केले होते. त्या माध्यमातून स्वतंत्र आणि आधुनिक पोलीस मुख्यालयाच्या दिशेने वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज येथे केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ व लोकार्पण आज करण्यात आले. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडला मिळालेल्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, पोलीस मुख्यालयासाठी ताथवडे येथील जमिनीच्या सातबाऱ्याचे हस्तांतरण आज करण्यात आले. पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील सक्षम यंत्रणेसाठी हे ऐतिहासिक पाऊल आहे. पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पोलीस दलासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चिखलीमध्ये पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत, पिंपरी पोलीस संकुल, आळंदी येथे पोलीस स्थानकाची नवी इमारत, वाकड येथे अपर पोलीस आयुक्त कार्यालय, अंमली पदार्थाविरुद्ध टास्क फोर्सचे मुख्यालय, वाहतूक कार्यालय, सायबर कार्यालय आदींमुळे पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयाला पायाभूत सुविधा मिळणार आहेत.
आजच्या काळात गुन्हेगारीचे स्वरुप बदलत आहे, शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे पोलीस दलाने आधुनिक होणे गरजेचे आहे. त्यामुळे आयटीएमएसमुळे वाहतुकीचे नियमन अधिक सुरळीतपणे होणार आहे. ज्येष्ठानुबंध या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना पोलीस दलाच्या माध्यमातून आधार आणि विश्वास मिळेल. दिशासारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा देण्याचे कार्य होत आहे. क्रीडा विभागाच्या माध्यमातून अशा उपक्रमांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. अंमलीपदार्थाविरुद्धच्या मोहिमेबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकात पोलीस आयुक्त चौबे यांनी आयुक्तालयाचे उपक्रम, नागरिक, उद्योग आदींच्या सुरक्षेबाबतची कामगिरी, आयुक्तालयासाठी वाहने, आधुनिक तंत्रज्ञान आदींसह विविध साधन सुविधांची उपलब्धता, आयुक्तालयाची यशस्वी कामगिरी आदींबाबत माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थविरोधी शपथ दिली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी दुष्काळ ग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगाराचा 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. पोलीस आयुक्तालयाच्या दिशा उपक्रमात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार उमा खापरे, विक्रम काकडे, शंकर जगताप, सुनील शेळके, सुनील कांबळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, चेतन तुपे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आदींसह लोकप्रतिनिधी, पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी, दिशा उपक्रमातील विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी ताथवडे येथे मंजूर झालेल्या जागेच्या 7/12 उताऱ्याचे औपचारिक हस्तांतरण आणि सार्वजनिक सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्तालयाच्या सीसीटीव्ही व एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
पिंपरी पोलीस ठाणे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 कार्यालय, अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे विभागीय कार्यालय व 200 शासकीय निवासस्थाने यांचा समावेश असलेले पिंपरी पोलीस संकुलाचे भूमिपूजन आणि पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 350 बॉडी-वॉर्न कॅमेरे, 4 ड्रोन व 65 नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पणही श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. नशामुक्त पिंपरी चिंचवड अभियानाचा शुभारंभदेखील यावेळी करण्यात आला.









