Farmer Relief Fund: समाधानकारक पावसाअभावी यंदा दुष्काळ निर्माण झाला आहे. दुष्काळाच्या या पार्श्वभुमीवर राज्यातील 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दुष्काळ निवारण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. दिवाळीपूर्वीच ही रक्कम दिली जाणार असल्याचंही सरकारने स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. तसे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
राज्य सरकारने राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे सर्व पंचनामे करण्यात येवून राज्य सरकारने केंद्राकडे 40 हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकार राज्याला किती कोटींचं पॅकेज देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच ही रक्कम दिली जाणार आहे.

त्यानुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवातही झाली होती. उरलेले पैसे जमा करण्यासाठी आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आदेश देणार असल्याचंही सांगितलं जात होतं. पण त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ऊर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
73 लाख शेतकऱ्यांना लाभ
मदतीची 5 हजार रक्कम वितरीत करण्यात येत आहे. आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित खात्यात आज आणि उद्या बाकीची रक्कम जमा होणार आहे. उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. त्यापूर्वीच खात्यात पैसे येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.









