Jamner News: जामनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून शेतात लागवड केलेला ३.३५ लाखांचा १३ किलो गांजा जप्त केला आहे. गुरुवारी
गुप्त माहितीच्या आधारे जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने दुपारी १४.१५ वाजता मालदाभाडी येथे छापा टाकून गांजा शेती करत असल्याचं उघडकीस आणलं. याप्रकरणी गांजा शेती करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे ३.३५ लाखांचा गांजा जप्त
मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी अनिल दगडू पाटील, (रा. मालदाभाडी, ता. जामनेर) याचे मालकी हक्काचे शेतात प्रतिबंधीत कॅनबिस वनस्पतीची (गांजा) झाडे मुळांसह मिळून आली. त्याचं एकूण वजन १३ किलो ४३० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ३,३५,७५० रुपये इतकी आहे. आरोपीनं स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व भविष्यात चोरटी विक्री करण्याचे उद्देशानं बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी आरोपीवर एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8(B), 20(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कारवाई
याप्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक शिरकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधीकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बोन्हाडे, पो.उप.निरी. अशोक कोकाटे, पो.उप.निरी. कृष्णा सोळुंके, ग्रे.पो.उप.निरी. जयसिंग राठोड, सहायक निरीक्षक साहिल तडवी, पोहेकॉ उमेश चौधरी, राजू तायडे, चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, विशाल लाड, ज्ञानेश्वर देशमुख, राजेश लहासे, चालक ज्ञानेश्वर बडगुजर आदींच्या पथकानं कारवाई केली.









