Jalgaon News: जळगावच्या शिवाजीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कौटुंबिक वादातून खून केल्याची घटना घडली. मेहुण्यानं धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात शालक सनी विनोद डोळे (२१ रा. शिवाजीनगर, जळगाव) याचा मृत्यू झाला. तर, आणखी एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. यावेळी सुरज वानखेडे याने सनीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.त्यात सनी गंभीर जखमी झाला. या हल्ल्याच्या घटनेनंतर सनीला तत्काळ जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. या घटनेनं सनीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे किरकोळ जखमी झाली. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई व आजीने रुग्णालयात आक्रोश केला ते पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित सुरज वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.










