Nagpur News: कुठलेही संकट अथवा आपत्ती आल्यास तिचा सामना कशा पद्धतीने करायचा यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मांडलेले विचार मागील अनेक पिढ्यांसाठी आत्मिक बळ देणारे ठरले आहेत. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेच्या निमित्ताने शनिवारी रात्री नेमक्या याच विचारांचा जागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासोबत साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. लोहारी सावंगा गावात दाखल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले. त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकुर, आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी तसेच गावचे सरपंच सतीश चापले हे देखील या प्रार्थना सभेत सहभागी झाले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रार्थना सभेत मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाच्या भजन मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजनांनी वातावरण भारून गेले होते. संकटाच्या काळात मानवी मनांना उभारी देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित या भजनांनी गावात एका आश्वासक वातावरणाची निर्मिती झाल्याचे चित्र अत्यंत भारावून टाकणारे होते.
राष्ट्रसंतांना वंदन करून या प्रार्थना सभेची सुरुवात झाली. त्यानंतर मौन प्रार्थना आणि राष्ट्रवंदना घेण्यात आली. यानंतर गुरुकुंज मोझरीच्या भजन मंडळाच्या वतीने ‘शेतकऱ्यांनो कामकर्यांनो..’, ‘मेरे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरणादायी भजने सादर करण्यात आली. गुरुकुंज आश्रम मोझरी येथील भजन मंडळाचे अमोल बांबल, शितल मांडवगडे, गजानन गायकवाड, चेतन अंभोरे, सागर भालचक्र, आकाश वानखडे, श्रावण सोनटक्के यांच्या चमूने ही भजने सादर केली. राष्ट्रवंदनेने या प्रार्थना सभेची सांगता झाली.
दरम्यान, लोहारी सावंगा हे ४२६४ लोकसंख्या आणि ८४४ कुटुंबांचे गाव आहे. कापूस, तूर, संत्रा, मोसंबी, सोयाबीन, चना, गहू ही येथील प्रमुख पिके आहेत. यंदा पावसाअभावी पिके करपली, संत्रा बागा सुकल्या. अशा कठीण काळात मुख्यमंत्र्यांनी गावात येऊन बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
शेतकऱ्यांना सिंचन विहिरी योजनेअंतर्गत दहा शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करण्यात आल्या. या विहिरींमुळे शेतकऱ्यांना आता बारमाही पाण्याची सोय होणार आहे.

लाभार्थी शेतकरी
- विमल शामराव खडगा
- सुमन रामभाऊ थापले
- रामचंद्र मधुकर घोडे
- मेघनाथ भिमराव राऊत
- खुशाल महादेव बरडे
- धनराज सदाशिव वैद्य
- तेजराव नथुजी फंदी
- संध्याताई मनोहर राऊत
- रमेश चंपत काळे
- दानीश खान हनिफ पठाण
“मुख्यमंत्री आमच्या गावात आले, आमचे दुःख ऐकले आणि थेट विहिरीचा लाभ दिला, हाच आमच्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे,” अशी प्रतिक्रिया लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
याच दौऱ्यात लोहारी सावंगा येथे साठवण तलावाचे बांधकाम करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. हा प्रकल्प लघु सिंचन मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
साठवण तलाव प्रकल्पाची ठळक माहिती:
– प्रकल्पाचे ठिकाण: मौजा लोहारी सावंगा, ता. नरखेड, जि. नागपूर – नरखेडपासून ४० कि.मी. अंतरावर, गावाच्या दक्षिणेस
– प्रकल्पाची अंदाजित किंमत: २४३.३५ लक्ष रुपये
– तलावाची लांबी: २९० मी., महत्तम उंची ९.९० मी., माथा रुंदी ३.०० मी.
– लघुत्तम संचय पातळी (L.S.L.): १०२.६० मी.
– निम्नतम नाला तळपातळी (N.B.L.): ९७.९० मी.
– सिंचन क्षेत्र: अप्रत्यक्ष सिंचन क्षेत्राला लाभ
– लाभ झालेले गाव: लोहारी सावंगा
या साठवण तलावामुळे शेतीच्या सिंचनाला लाभ मिळेल, गावातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्याची सोय होईल आणि या परिसरातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. या तलावासाठी वन विभागाच्या मान्यतेने भूसंपादन झालेले आहे. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.








