Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहे; पण, आरक्षणापूर्वीच इच्छुकांची नावे चर्चेत आली आहे. त्यामुळे महापौरपदासाठीही इच्छुकांमध्ये रस्सीखेच होणार आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. कमळ चिन्हावर निवडणूक लढवलेल्या भाजपचे सर्व ४६ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेही दमदार कामगिरी करत धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रभाग क्रमांक १ मधून प्रफुल्ल देवकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले.
अपक्ष उमेदवार भारती सागर सोनवणे हे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याने महायुतीचे संख्याबळ ७५ पैकी ७० इतके भक्कम झाले आहे. महायुतीतील समन्वयानुसार महापौर पद भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही पक्षांकडून आतापर्यंत या पदांची संधी न मिळालेल्या जुन्या, निष्ठावंत व तरुण चेहऱ्यांची नावे पुढे येत असून, त्यावर पक्षांतर्गत पातळीवर चर्चा सुरू आहे. भाजपकडे महापौरपदासाठी संभाव्य नावांची यादी तयार असल्याची माहिती मिळत आहे.
यांची नावे चर्चेत
जळगाव महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आलेले डॉ. विश्वनाथ खडके यांच्यसह उज्ज्वला बेंडाळे, शुचिता हाडा, दीपमाला काळे, नितीन बरडे, सुनील वामनराव खडके, राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीत भाजपकडून आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले नितीन लढ्ढा, सुनील महाजन व जयश्री महाजन यांना महापालिकेतील पदांऐवजी संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडत जाहीर होताच महापालिकेतील सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने याकडे शहराचे लक्ष लागले आहे.








